मुंबई-
ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आणि तुम्ही वाहन चालवत असाल तर दंड आकारला जातो हे तर तुम्हाला माहितच असेल. पण तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि त्याची वैधता किती आहे हे जर तुम्ही पाहिलं नसेल तर याचाही फटका तुम्हाला बसू शकतो. नव्या नियमांनुसार ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपलेली असेल आणि तुम्ही ते वापरत असाल तर तुमच्याकडून ५ हजारांचा दंड वसुल केला जाऊ शकतो.
आरटीओकडून निर्धारित वैधतेसह ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात येतं. वैधता संपल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स वैध ठरत नाही. त्यामुळे ते रिन्यू करणं महत्वाचं आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू कसं करायचं ते जाणून घेऊयात.
देशात क्षेत्रीय परिवहन कार्यालयाकडून म्हणजेच आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येतं. सामान्यत: ड्रायव्हिंग लायसन्स २० वर्षे किंवा अर्जदाराच्या वयाच्या ५० वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत लायसन्स वैध असतं. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करून घ्यावे. तुम्ही संबंधित RTO ला भेट देऊन किंवा ऑनलाइन पद्धतीनं तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचं नूतनीकरण करू शकता.
लायसन्स ऑनलाइन पद्धतीनं रिन्यू करण्याची पद्धतपरिवहन मंत्रालयाने एक वेब पोर्टल तयार केलं आहे जिथून तुम्ही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परवाना नूतनीकरणासाठी अर्ज करू शकता. या पोर्टलचं नाव परिवहन सेवा असं आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाशी संबंधित अनेक सुविधा या पोर्टलवर उपलब्ध आहेत. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता कालबाह्य होत असल्यास, तुम्ही या पोर्टलवरून त्याचं नूतनीकरण करू शकता. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचं नूतनीकरण करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा..
- परिवहन सेवा पोर्टलला भेट द्या
- ऑनलाइन सर्व्हीसवर क्लिक करा
- ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा हा पर्याय निवडा
- ड्रॉप-डाऊन लीस्टमध्ये तुमचं राज्य निवडा
- अल्पाय फॉर रिन्यअल पर्याय निवडा आणि पुढे जा.
- तुमचा लायसन्स नंबर, जन्म तारीख आणि कॅप्चा कोड नोंदवून सबमिट करा
- पुढची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन ऑनलाइन फॉर्म भरा आणि शुल्क भरा.
- शुल्क भरल्यानंतरची पावती तुम्हाला मिळेल ती डाऊनलोड करा आणि सांभाळून ठेवा.