मोटारीचा शोध लागल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे बदल झाले. इंजिन, त्याची ताकद, त्या मोटारीमधील विविध सुविधा इतकेच नव्हे तर मोटारीच्या अंतर्भागातील रचनेमध्येही ही बदलाची व नवनव्या सुधारणांची बाब सतत राहिली आहे. मोटारीतील अंतर्गत सौंदर्य, रचना,त्यातील सुविधांची संख्या वाढवणे, संरक्षण आदी विविध दृष्टीकोनातून कारमध्ये प्लॅस्टिकचा वापर होऊ लागला. दरवाज्याचा आतील भागातील आवरण, डॅशबोर्ड, आसन व्यवस्था, त्यामधील मुठी, नॉब, आदी छोट्या गोष्टींसाठीही प्लॅस्टिकचा वापर होणे हे क्रांतिकारी ठरले.
उत्पादनमूल्य कमी होण्याबरोबरच, संरक्षण, सौंदर्य, वजनाला हलकेपणा आणणे, स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणे, टिकावूपण वाढणे आदी विविध कारणांसाठी प्लॅस्टिकचा वापर कारमध्ये होत आहे. तुम्हाला कारमध्ये एखाद्या वस्तू ठेवण्यासाठीही प्लॅस्टिकच्या विशिष्ट रचनेद्वारे कप्पे करून देण्याची ताकद याच प्लॅस्टिकने सिद्ध केली आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने प्लॅस्टिक या घटकावर होत असणारी टीका लक्षात घेतली तरी त्यावर पर्यावरणासाठी अन्य उपाय असणारे रियुझेबल प्लॅस्टिकही काढले गेले आहे.कारच्या या अंतर्गत रचनेमध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे कितीही टीका जरी झाली तरी उपयुक्तता वाढलेली आहे, हे नाकरता येणार नाही.
प्लॅस्टिकबरोबर अन्य घटकही या कारच्या अंतर्गत भागामध्ये वापरले जातात. त्यांना पूर्ण प्लॅस्टिक म्हणता येणार नाही, ते एकप्रकारचे उपघटक आहेत. यामध्ये पॉलीप्रॉपलीन वा फायबरग्लास, पॉलीकार्बोनेट, अॅक्रिलोनिट्राईल बुटाडाईन स्टीरेन, पीव्हीसी, पीयूआर, आदी विविध प्रकारच्या घटकांचा समावेश आहे. या प्रत्येक घटकांचीही काही वेगवेगळी वैशिष्टये असून त्याचा फायदा कार उत्पादकांना व ग्राहकांनाही झाला आहे. काहींमध्ये असलेला चिवटपणा, ताठरपणा, मजबुती, टिकावूपणा, चमकदारपणा, रंग, रंगवण्याचीही उपयुक्तता,लवचिकता, पुनर्वापर, जास्त वजन पेलण्याचीही काही घटकांची ताकद या सर्व बाबी जमेस धरून विविध घटकांचा उपयोग केला जातो. सर्वसाधारणपणे आपण त्याला प्लॅस्टिक म्हणून म्हणत असतो.
कारच्या इन्स्ट्रुमेंट पॅनेल, डॅशबोर्डमधील विविध रचना, दरवाजांना आतील बाजूने असणारे आवरण, स्टिअरिंग व्हीलवरील आवरण, बाहेरच्या बाजूने असणारे बम्पर्स अशा अनेक डोळ्यांना दिसणाऱ्या प्लॅस्टिक घटकांप्रमाणेच न दिसणारे छोटे घटकही कार उत्पादनात कॉस्ट कमी करणारे ठरले आहेत. एकंदर वाहन उद्योगामध्ये सुमारे १३ प्रकारच्या विविध प्रकारच्या प्लॅस्टिक व संलग्न घटकांचा वापर केला जात असून ते अतिशय उपयुक्त ठरले आहेत.