देशभरातील नेते, उद्योगपतींविरोधात ईडीने जोरदार मोहिम उघडलेली असतानाच आता लंडनची जगप्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी रोल्स रॉयसही ईडीच्या रडारवर आली आहे. रोल्स रॉयसवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आले आहे.
ईडीने माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गेल्या महिन्यात चौकशी केली आहे. आता ईडीने रोल्स रॉयसला मनी लाँड्रिंगविरोधात नोटीस पाठविली आहे. कंपनीवर आरोप आहे की, 2007 ते 2011 दरम्यान भारतातील काही संस्थांकडून कंत्राट मिळविण्यासाठी दलालांना 77 कोटींची लाच दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, यंदा जुलैमध्ये सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. यानंतर ईडीने पैशांची अफरातफरविरोधी कायद्यानुसार खटला दाखल केला आहे. सीबीआयने रोल्स रॉयस आणि त्यांची भारतीय कंपनी, सिंगापूरच्या अशोक पटनी यांची कंपनी आशमोर प्रा. लि., मुंबईतील टर्बोटेक एनर्जीशिवाय हिंदुस्तान एरोनॉटिक्स (एचएएल), ओएनजीसी आणि गेलच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हेगारी कट रचने आणि लाचखोरीची तक्रार केली होती.
यामध्ये 2000 ते 2013 या दरम्यान एचएएलसोबत रोल्स रॉयसने 4700 कोटी रुपयांचा व्य़वसाय केला आहे. या काळात 2007-11 दरम्यान हलने 100 एलीसन इंजिनांसाठी सल्लागार पटनी यांना 18 कोटी रुपये दिले होते. मात्र, पटनी आणि रोल्स रॉयसच्या संबंधांबाबतचे पत्र संरक्षण मंत्रालयाला मिळाल्याने य़ाबाबतचा खुलासा झाला होता. यानंतर सीबीआयने चौकशी सुरू केली होती. यानंतर रोल्स रॉयसने चुकीच्या पद्धतीने केलेले व्यवहार खपवून घेणार नसल्याचे म्हटले होते. अशाच प्रकारे अन्य सरकारी संस्थांमध्ये लाचखोरी झाली आहे.