नवी दिल्ली : सध्या ऑटो सेक्टरमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातच आता रॉयल एनफिल्डने मोटारसायकल विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात देशांतर्गत बाजारात 834895 युनिट्सची विक्री केली. तसेच, कंपनीने 1 लाखांहून अधिक युनिट्सची निर्यात केली आहे. यापूर्वी 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीने 7.34 लाख युनिट्सची विक्री केली होती. हे पाहता यामध्ये 39 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
कंपनीने विक्रीत वाढ होण्यामागे सतत सुधारणा होत असलेले मॉडेल्स आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या मोटारसायकलक्स असल्याचे सांगितले आहे. यासोबतच कंपनीचा असा विश्वास आहे की, 350 सीसी आणि त्याहून अधिकच्या सेगमेंटमध्ये लोकांना खूप पैसे मोजावे लागतात. परंतु रॉयल एनफिल्डच्या बाईक त्यांच्यासाठी योग्य किमतीत उपलब्ध आहेत.
गेल्या मार्चमध्ये रॉयल एनफिल्डने एकूण 72,235 मोटारसायकली विकल्या. यामध्ये भारतीय बाजारपेठेत 59,884 आणि 12,351 युनिट्सची निर्यात झाली. मार्च 2022 च्या तुलनेत 6.73 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीचे सीईओ बी गोविंदराजन यांनी सांगितले की, कंपनीने विक्री आणि बाजारपेठेत नवीन उंची गाठली आहे. कंपनीच्या हंटर 350 या मोटारसायकलला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विक्रीच्या संख्येत हंटर 350 चा मोठा वाटा आहे.
याचबरोबर, 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनी नवीन रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. यामागे कंपनीचा तर्क असा आहे की, 350 सीसी, 450 सीसी आणि 650 सीसी सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लाँच केले जात आहेत. हे सर्व मॉडेल्स लोकांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहेत. सर्वात लोकप्रिय 350 सीसी सेगमेंटमध्ये कंपनी आता बुलेट 350 ची नवीन जनरेशन आणि शॉटगन 350 बॉबर लाँच करणार आहे.
नवीन इंजिनसह येतील बुलेटकंपनी नवीन जनरेशनच्या बुलेटमध्ये इंजिन देखील बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये मिटिओरचे 346 सीसी सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन दिले जाईल, जे 20.2 बीएचपीचे पॉवर जनरेट करते. यासोबतच कंपनी हिमालयन 450, शॉटगन 650 आणि स्क्रॅम्बलर 650 मॉडेल्स लाँच करण्याचा विचार करत आहे.