गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याचे तीन-चार प्रकार घडले आणि त्या घेऊ इच्छिणाऱ्यांच्या मनात खळबळ उडाली. परंतू पेट्रोलची वाहने तरी कुठे सुरक्षित आहेत. तुम्ही हा रॉय़ल एन्फील्ड बुलेटचाच व्हिडीओ पहा, आधी आग लागली आणि नंतर एक मोठा धमाका झाला. एवढा की तिथल्या लोकांच्या पायाखालची जागा हलली.
एका व्यक्तीने मोठ्या हौसेने नवीकोरी बुलेट घेतली होती. तिची पूजा करण्यासाठी ती एका मंदिराच्या समोर लावली होती. अचानक या बाईकला आग लागली आणि एखाद्या बॉम्बसारखी ती फुटली. ही घटना कर्नाटकच्या म्हैसूरमधील आहे. रविचंद्रा नावाच्या व्यक्तीने ही बुलेट घेतली होत. पूजा करण्यासाठी तो तिला आंध्रप्रदेशच्या अनंतपूर येथील प्रसिद्ध कासापुरम आंजनेय स्वामी मंदिरात गेला होता. उगाडी सणामुळे तिथे रथयात्रेचे आयोजन केले जाते. यामुळे तिथे मोठी गर्दी असते. एका पुजाऱ्यासोबत रविचंद्र पुजेची तयारी करत होता, तेवढ्यात बुलेटला आग लागली.
बुलेटला आग लागल्याने मंदिराच्या बाहेर पळापळ झाली. थोड्याच वेळात आग नियंत्रणाबाहेर गेली आणि बुलेट एखाद्या बॉम्बसारखी फुटली. मोठा आगीचा गोळा पसरला. मंदिरात पूज अर्चा करणारे लोकही त्या आवाजाने सैरावैरा पळू लागले. कोणालाच काय घडले हे समजेना. बुलेट जिथे उभी केली होती तिथे पार्किंग होते. तिथे उभ्या असलेल्या गाड्यांनाही आग लागली. स्थानिक पोलिसांनी ही आग विझविली. परंतू ज्या लोकांनी बुलेट फुटताना पाहिली त्यांच्या पायाखालची जमिन हादरली.