लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोटारसायकल, कार किंवा स्कूटर चालकांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र (पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट) नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. ज्या वाहन चालकांकडे हे सर्टिफिकेट नसेल त्यांच्याकडून १०हजार रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो. केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ नुसार प्रत्येक मोटार वाहन जे बीएस १, बीएस २, बीएस ३ आणि बीएस ४ इंजीनवर चालतं त्या प्रत्येक वाहनधारकाकडे पीयूसी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.
याबाबत बोलताना परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वैध पीयूसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालवणाऱ्या चालकास ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास अथवा १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, किंवा या दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतील. त्याचबरोबर चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्सही तीन महिन्यांसाठी रद्द केले जाऊ शकते.
कुठे मिळेल पीयूसी?
- शिक्षेची तरतूद कळल्यानंतर आता तुम्हीदेखील तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र लगेच तपासून पाहाल.
- जर, तुमच्या गाडीचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल, तर ते बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्हाला गाडी घेऊन तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावरील प्रदूषण तपासणी केंद्रात अर्थात पीयूसी सेंटरवर जावे लागेल.
- तिथे सेंटरवर उपस्थित कर्मचारी गाडीची तपासणी करतील. त्यानंतर पीयूसी प्रमाणपत्र तुम्हाला देतील. यासाठी फारसा वेळही लागत नाही. तसेच, अवघ्या ५० ते १०० रुपयांचा खर्च येतो.
पीयूसी सर्टिफिकेट म्हणजे काय?
वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांसाठी पीयूसी सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतंही वाहन किती प्रदूषण करते, याची तपासणी केली जाते. त्यानुसार वाहनांची तपासणी करून पीयूसी सर्टिफिकेट दिलं जाते.