मारुती सुझुकीने बीएस 6 नियमावलीमध्ये बसणारी त्यांची Eeco ही बहुपयोगी कार लाँच केली आहे. मारुतीने ओम्नी ही कार बंद केली होती. यामुळे Eeco ही सात सीटर कारही बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
बीएस ६ नियमावलीमध्ये प्रवाशांची सुरक्षा महत्वाची मानली गेली आहे. यामध्ये एबीएस, पार्किंग सेन्सरसह दोन एअरबॅग बंधनकारक करण्यात आल्या होत्या. मारुतीने या कारमध्ये बदल करून नवीन कार लाँच केली आहे. यामध्ये 1.2 लीटरचे चार सिलिंडरचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 73 बीएचपी ताकद आणि 101 एनएम टॉर्क उत्पन्न करते. तसेच सीएनजीच्या पर्यायामध्येही कार उपलब्ध करण्यात आली आहे. सीएनजी 21.8 किमी प्रतिलीटर मायलेज देते. एकूण इकोच्या विक्रीपैकी 17 टक्के कार या सीएनजीच्या विकल्या जातात.
इको ही सात सीटर मल्टीपर्पज कार 2010 मध्ये लाँच करण्यात आली होती. दोन वर्षात या कारने 1 लाखांचा विक्री टप्पा गाठला होता. तर 2014 या एका वर्षामध्ये 1 लाख कार विकल्या गेल्या होत्या. 2015 मध्ये मागणी मोठी असल्याने कार्गो इकोही लाँच करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास 6.5 लाख इको कार विकल्या गेल्या आहेत.
इकोची एक्स शोरुम किंमत 3.81 लाख रुपये ठेवण्यात आली असून एसी मॉडेलची किंमत 4.21 लाख रुपये आहे. बीएस ६ मुळे या कारच्या किंमती 20 ते 30 हजार रुपयांनी वाढलेल्या आहेत. या किंमती पेट्रोल मॉडेलच्या असून अद्याप सीएनजी मॉडेलच्या किंमती जाहीर केलेल्या नाहीत.