सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरून दुचाकी विशेष करून स्कूटर चालवताना अतिशय जपून चालवणे गरजेचे आहे. खास करून रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक्स जसे धोकादायक असतात, त्याचप्रमाणे रस्त्यावरील पावसाळी गटारांवरीची लोखंडी झाकणे (manhole covers) ही देखील अतिशय धोकादायक ठरू शकतात. केवळ पावसातच नव्हे तर पावसाळ्या व्यतिरिक्तच्या दिवसातही ही लोखंडी झाकणे दुचाकीसाठी व खास करून स्कूटरसाठी अपघात करणारी ठरू शकतात.पावसाळ्यामध्ये या झाकणांवर पाणी पडलेले असते, कधी त्याच्यावर अन्य घाणही झालेली असते, त्यामुळे ती अधिक बुळबुळीत झालेली असतात. त्या झाकणांच्या कडांवरून स्कूटरचे चाक ज्यावेळी जाते तेव्हा त्या टायरची रस्त्यावर असणारी पकड झाकणांवर व त्या झाकणांच्या कडावरून निसटते. स्कूटरची चाके व टायर्स हे मुळात मोटारसायकलपेक्षा आकाराने व रूंदीनेही लहान असतात. त्यामुळे रस्त्यावर त्यांची पकड ही मुळात मोटारसायकलच्या तुलनेत तशी कमी असते. त्याचप्रमाणे वजनालाही त्या तुलनेत हलक्या असल्याने आजकालच्या ऑटो गीयरच्या स्कूटरची एकूणच रस्त्यावर असणारी पकडही तशी फार मजबूत असत नाही. हे लक्षात घेता रस्त्यावरच्या या गटांरांवरील चौकोनी, गोल लोखंडी झाकणांवरून स्कूटर नेताना त्या झाकणांचा पावसामध्ये ओली झाल्याने असलेला बुळबुळीतपणा, त्यांच्या कडांना असलेला निसरडा आकार यामुळे स्कूटरचा समतोल अनेकदा बिघडत असतो. परिणामी स्कूटरची टायरद्वारे रस्त्यावर असणारी पकड ही चांगलीच ढिली पडते. रस्त्यावर या झाकणांभोवती असलेली सिमेंटची चौकट किंवा पेव्हर ब्लॉकद्वारे त्याला सर्व बाजूने केलेले फ्लोअरिंग हे देखील खराब झालेले असते.पावसाळ्यामध्ये त्या चौकटीलाही खड्डे गेलेले असल्याने स्कूटरसाठी हा भाग अतिशय अपघातग्रस्त अशाच स्वरूपाचा असतो. गटाारांच्या या झाकणांसाठी लोखंडाचा वापर प्रामुख्याने केलेला असतो. किमान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तरी ही लोखंडी झाकणे,जाण्या, पूर्ण बंद असणारी असतात. नवीन असताना त्या झाकणांना खाचे वा उंचवटे असतात, त्यामुळे त्यांचा निसरडेपणा कमी झालेला असतो. पण कालांतराने त्यावरून सतत वाहने जाऊन त्याचा नवीन असताना असणारा पृष्ठभाग जसा खडपडीत असतो, तो जाऊन त्या झाकणाच्या या पृष्ठभागाला गुळगुळीतपणा येतो व पावसामध्ये तो बुळबुळीत होतो.यामुळे स्कूटरचा टायर नवा असूंद्या किंवा काहीसा वापरलेला या झाकणांवर स्कूटर घसरण्याची शक्यता असते. काहीवेळा ही झाकणे ज्या पद्धतीने बसवलेली असतात, त्याचा पाया ढासळतो, त्यांची स्तर बिघडतो, ती हलत असतात. कधी कधी ती उघडीही असता. यामुळेही अशा प्रकारच्या झाकणांवरून स्कूटर नेताना ती स्थिती अपघातजन्य अशी असते. तेव्हा रस्त्यावरून स्कूटर वा दुचाकी नेताना अशा प्रकारच्या लोखंडी झाकणांवरून जाताना अतिशय सावधपणे व योग्य गतीने स्कूटर न्या. काहीवेळा यामध्ये होणारा अपघात हा फार मोठा नसतो, पण स्कूटर कलंडण्याची शक्यता, पायांवर वा हातावर त्यामुळे अतिरिक्त जोर येण्याची शक्यता यामुळे छोट्या छोट्या शारीरीक त्रासालाही तोंड देम्याची वेळ येते. तेव्हा गटारावरील या झाकणांपासून सावधान.
गटारांवरील लोखंडी झाकणांवरून स्कूटर चालवा सावधपणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 9:16 PM