Sachin Tendulkar Mahindra EV Car : क्रिकेटचा सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) महागड्या रेसिंग गाड्यांची आवड आहे, हे अनेकांना माहित आहे. यातच सचिनने हैदराबादमध्ये ई-फॉर्म्युला कार रेसमध्ये हजेरी नोंदवली. भारतातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राने नुकतीच लाँच केलेली जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार पिनिनफेरिना बॅटिस्टामधून (Pininfarina Battista) सचिनने राइडही घेतली.
या प्युअर इलेक्ट्रिक हायपरकारची कामगिरी पाहून सचिन कारचा चाहता झाला. सोशल मीडियावर त्याने या कारचे जोरदार कौतुकही केले. हैदराबाद ई-फॉर्म्युला रेस दरम्यान पिनिनफरिना बॅटिस्टा प्रथमच भारतात लाँच करण्यात आली. कौतुकाची बाब म्हणजे, पिनिनफेरिना ही भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्राच्या मालकीची कंपनी आहे. या हायपरकार बॅटिस्टा ची किंमत तब्बल 18 कोटी रुपये आहे.
सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, 'इलेक्ट्रीक EV कारला भविष्य आहे का? या प्रश्नासाठी पिनिनफरिना बॅटिस्टा हे उत्तर आहे. हे काळाला आव्हान देऊन भविष्यात प्रवेश करण्यासारखे आहे. अशा अत्याधुनिक, जागतिक दर्जाची कार विकसित केल्याबद्दल महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन,' असे ट्विट सचिनने केले.
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सचिनला प्रत्युत्तर देत म्हटले की, 'काळाला आव्हान देऊन भविष्यात प्रवेश. ही पिनिनफेरिना बॅटिस्टासाठी एक उत्तम टॅगलाइन आहे. आज तू आमच्यामध्ये आलास, याचा खूप आनंद आहे,' असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटू दिसले. याशिवाय नागार्जुन, राम चरण आणि मल्याळम अभिनेता दुल्कर सलमान यांच्यासह अनेक चित्रपट व्यक्तिमत्त्वांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.