शहरांमधील वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहेच. एकूण रस्त्यांची लांबी कमी व वाहने जास्त अशी प्रामुख्याने स्थिती असल्याने त्यावर मार्ग काढण्याचा आटोकाट प्रयत्न वाहतूक पोलीस करीत असतात. त्यासाठी रस्त्यांवर सिग्नल्सची व्यवस्था केलेली असते. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये संगणकीकृत असणारी ही व्यवस्था सकारात्मकदृष्टीने बसवलेली आहे पण शहरातील वाहनचालक हे नकारात्मक दृष्टीनेच बहुधा या व्यवस्थेकडे पाहातात व सिग्नल्सचे उल्लंघन करून आपल्या मोटारी,स्कूटर्स, मोटारसायकली इतकेच नव्हे तर अगदी मोठ्या अवजड वाहनांचे चालकही आपले वाहन पुढे दामटण्याची कृती करतात. वाहतूककोंडी मोकळी करण्याचे किंवा सिग्नल व्यवस्था प्रभावीपणे राबवण्याचे काम हे एकट्या वाहतूक पोलीस यंत्रणेचे नाही, त्यात आपल्या सर्व नागरिकांचाही वाटा आहे व असायला हवा. मात्र तसे होत नाही, त्यामुळे अतिशय बेभानपणे वाहने चालवणे, सिग्नल बिनदिक्कत उडवणे, पादचाऱ्यांचाही विचार न होणे व पादचाऱ्यांकडूनही सिग्नल्सचे उल्ल्ंघन होणे अशा गोष्टी सातत्याने घडत असतात,जोपर्यंत आपण ही सिग्नलची शिस्त अंगी बाणवत नाही, तोपर्यंत वाहन तुम्हा चांगले चालवता येत आहे असे म्हणता येणार नाही. सिग्नल्सचा अर्थ न समजण्याइतके वाहन चालक अशिक्षित नक्की नाहीत. पण बेदरकार मात्र बनलेले आहेत. प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा असतो, पण त्यासाठी सिग्नल्सचे पालन करणे गरजेचे आहे. रस्त्यावर गेल्या काही दिवसांमध्ये झेब्रा क्रॉसिंगच्या आधी पांढरे पट्टे आखलेले असतात, त्याचा अर्थ तुम्ही तुमचे वाहन लाल सिग्नलद्वारे तुम्हाला पुढे जाण्यास रोखलेले असताना, तुम्ही या झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या आडव्या पांढऱ्या पट्ट्याच्या पुढे येता कामा नये. सिग्नल लागल्यानंतर करकचून ब्रेक लावणे किंवा धुडकावून पुढे जाणे यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये किती भीषणता असते, हे सोशल मिडियावरील व्हिडियोचवर अनेकांनी पाहिलेले असतेही, पण त्यातून शहाणे न झालेले अनेक जण सातत्याने शहरांमध्ये पाहायला मिळतात. विशेष करून शहरातील वाहतूक ही या सिग्नल व्यवस्थेवर आधारित असते.वाहतूक पोलीस हे त्या सिग्नल व्यवस्थेच्या आधारे काम करीत उन्हातान्हातून उभे राहात असतात, ते त्यांच्या नोकरीसाठी तेथे उभे नसतात तर तुमच्या वाहतूककोंडीला कमी करण्यासाठी असतात. त्यांच्याविषयी मुळात अनेक गैरसमज मनामध्ये ठेवणारे अनेक नागरिक आहेत. सिग्नल्सचा वापर नीटपणे केला गेला तर किमान अति वाहतूककोडींच्या ठिकाणीही कमी त्रास होऊ शकतो. वाढत्या वाहनांना आळा घालण्याचे काम केवळ सरकारचे नाही, आपणा सर्वांचे आहे. वाहन तर हवे, मग त्याच बरोबर येणाऱ्या या समस्यांना सोडवण्यासाठी असलेल्या सिग्नल्सचे अवलंबन करण्यात लाज कसली वाटते हा प्रश्न आहे.मुंबईसारख्या शहरांमध्ये सिग्नल्सवर सीसीटीव्ही बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सुरुवात झाली आहे, ही सुरुवात तशी फारच मंद गतीने असली तरी त्या प्रणालीला कठोरपणे अवलंब केला गेला पाहिजे. तसे झाले तर किमान ६० टक्के वाहनांबाबत कारवाई होऊल हे लक्षात घ्यायला हवे. आपल्याकडून चूक होऊ नये यासाठी मुळात आपली कायद्याचे व नियमांचे पालन करण्याची मानसिकता प्रत्येक भारतीयाने बनवायची गरज आहे. वाहतूककोंडीच्या समस्येवर प्रथम सिग्नल्स व नियमांचे पालन हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तुमच्या बेफिकीर वाहनचालनामुळे दुसऱ्याचा प्राण जाऊ शकतो, इतकेच कशाला तुमचाही प्राण जाऊ शकतो, यासाठीच सिग्न दिल्या जाणाऱ्या सूचनांचे प्रथम पालन करा. आज ना उद्या सीसीटीव्ही द्वारे असणारे नियंत्रण कठोर होणार आहेच पण तोपर्यंत तरी स्वयंनियंत्रणही चांगल्या ड्रायव्हरसाठी गरजेचे असणार आहे.अन्यथा तुमची वाईट सवय तुमचाच घात करू शकेल, हे लक्षात ठेवा.
सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी रस्त्यावरच्या सिग्नल्सचे बंधन पाळायलाच हवे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 3:33 PM