मुंबई : इंधनाचे वाढते दर व पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) खरेदी केली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत ६,९४७ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सुमारे ४,१९१ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर आता ऑगस्टपर्यंतच त्यापेक्षा अधिक ६,९४७ वाहनांची विक्री झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वधिक विक्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा इंधनावर होणारा खर्च खूपच कमी झाला आहे. परिणामी, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. वर्ष संपण्यास आणखी चार महिन्यांचा काळ आहे. त्यामुळे दुचाकी विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्यांचा वेग कमी असल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. इलेक्ट्रिक वाहन धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये हे धोरण आले. इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढविण्यासाठी २३ जुलै २०२१ रोजी सुधारित धोरण आणण्यात आले. वाहनचालकांनी सर्वाधिक पसंती दुचाकीला दिली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये कारपेक्षा दुचाकीला प्राधान्य दिले जात आहे. या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही तुलनेने कमी आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मी इलेक्ट्रिक दुचाकी वापरत आहे. मेन्टेनन्स अजिबात नाही. रोज तीन ते चार तास चार्ज केल्यानंतर दुचाकी १२० किमीपर्यंत धावते. यामुळे इंधनाच्या खर्चात मोठी बचत होत आहे.- सुरेश नाईक, ई-वाहनधारक
डिझेल आणि पेट्रोलचे दर भयंकर वाढल्याने इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. त्यामुळे खर्चाची मोठी बचत होत आहे.- वसंत सोनावणे, ई-वाहनधारक