सर्व वाहनचालकांना सीट बेल्ट सक्तीचा आहे. पुढे त्याच्या बाजूला असणार्या प्रवाशालाही हा सीट बेल्ट सक्तीचा आहे. पण लक्षात कोण घेतो, अशीच स्थिती अनेक वाहनचालकांबाबत दिसून येते. शहराबाहेर गेले की सीटबेल्ट काढून टाकण्याचे अवाजवी धाडस केले जाते. संपूर्ण देशात मोटारीतील हा सीट बेल्ट सक्तीचा आहे हे सातत्याने सांगण्याची आवश्यकता आहे, ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. सीट बेल्ट बरोबरच एअरबॅग असणे ही देखील संलग्न गरज आहे. पण मोटारकंपन्या हा पर्याय म्हणून ग्राहकापुढे ठेवत आहेत.
एअरबॅगही एक सुक्षिततेसाठी मोटारीत असणारी एक वेगळी सामग्री आहे. खरे पाहाता एअरबॅग सेन्सरद्वारे अपघाताच्यावेळी फुगणे व त्याचवेळी आसनस्थ व्यक्ती सीटबेल्टमुळे अचानक जास्त प्रमाणात पुढे येण्याचे प्रमाण कमी होणे वा रोखले जाणे ज्यामुळे एअरबॅगवर अवाजवी दाब न येता एअरबॅग फुगलेली असताना त्यावर अपघाताच्यावेळी आसनस्थ व्यक्ती आदळण्याचे प्रमाण कमी झाल्याने तिला दुखापत कमी होईल, अशी ही क्रिया आहे.
थोडक्यात सीटबेल्टचे हे महत्त्व पाहाता सर्वसाधारण अपघात वा त्यासारखी क्रिया, विशेष करून अचानक ब्रेक लावल्याने आसनस्थ व्यक्ती पुढे आदळण्याची शक्यता कमी करणे ही क्रिया सीट बेल्टमुळे घडली जाते. हा सीट बेल्ट मोटार वाहन कायद्यााने सक्तीचा करण्यात आला आहे. १९६१मध्ये अमेरिकेतील विस्कोनसिन येथे मोटारीतील पुढील आसनस्थ व्यक्तींना हा सीटबेल्ट सर्वप्रथम सक्तीचा करणारा कायदा करण्यात आला. ऑस्ट्रेलियात व्हिक्टोरियामध्ये मोटारीतील पुढील व मागील आसनस्थ व्यक्तींना हा सीट बेल्ट १९७० मध्ये कायद्यााने सक्तीचा करण्यात आला.
त्यानुसार मोटारीत अशा सीट बेल्टची तरतूद करण्यात आली तेव्हापासून या सीट बेल्टच्या साधनाला मोटारीमध्ये वापरात आणण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९८० पर्यंत अन्य देशांनीही ही तरतूद सक्तीची केली. रस्त्यावरील विविध प्रकारच्या अपघातांमध्ये समोरून मोटार एखाद्याा मोठ्या वस्तूवर आदळणे किंवा अन्य वाहनांवर आदळणे. त्या टक्करीमध्ये मृतांचे प्रमाण वाढलेले असल्याने अशा प्रकाराला रोखण्यासाठी काही उपाय करता येईल का, याविषयी संशोधन चालूच होते. त्यातूनच या सीट बेल्टचा जन्म झाला, असे म्हणता येईल.