खळ्ळ खट्याक … आवाज आणि इतस्तत: विखुरणारे तुकडे-काच फुटल्यावरच्या अगदी स्वाभाविक गोष्टी! परंतु असे काचेच्या बाबतीत सर्वसाधारण दिसत असले तरी गाडीची समोरची काच फुटली तर मात्र असे घडताना दिसत नाही. ती फुटली तरी सर्व तुकडे तिथेच राहतात व कोळ्याच्या एखाद्या जाळ्याप्रमाणे नक्षी तयार होते. हे तर नवलच म्हणावे लागते. यासा सुरक्षित काच असे सर्वसाधारण भाषेत म्हटले जाते. काच फुटल्यानंतरही ती विखुरली जात नाही, अशा या काचेला लॅमिनेटेड ग्लास असे म्हणतात आणि हा गुणधर्म तिला तिच्या रचनात्मक वैशिष्ट्यांमुळे प्राप्त झालेला आहे.
ही काच तयार करत असताना दोन काचेच्या थरांमधे एक प्लॅस्टिकचा म्हणजेच 'पॅालिव्हिनील ब्युटीरल'चा थर असतो.ह्या थरामुळे काच फुटली तरी तिचे तुकडे होउन न विखुरता ते एकाच ठिकाणी जोडलेले राहून जाळीदार स्वरूपात दिसतात. त्यामुळे वाहनातील व वाहनाजवळील व्यक्तींना काचेचे तुकडे लागून होणारी इजा टाळली जाते. अशा काचा वापरण्यापूर्वी जेव्हा साध्या काचा वापरल्या जात असत तेव्हा अपघातामध्ये काचांचे तुकडे लागल्यामुळे प्रवाशांना मोठी इजा झाल्याचेही दाखले सापडतात. लॅमिनेटेड काचांचा वापर वाढल्यापासून गाडी उलटण्यासारख्या गंभीर स्वरुपाच्या अपघातातही गाडीतील माणसांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे.
यात आणखी एक गंमतीची बाब म्हणजे या काचेचा शोध हा जाणीवपूर्वक नव्हे तर चुकूनच लागलेला आहे. १९०३ साली फ्रेंच शास्त्रज्ञ एडूओर्ड बेनेडीक्टस प्रयोगशाळेत काम करत असताना एका काचेच्या भांड्यावर चुकीने प्लॅस्टिकचा थर बसला. हे भांडे जेव्हा खाली पडले तेव्हा ते न फुटलेले बेनेडीक्टस यांनी पाहिले. त्यातूनच त्यांना ही कल्पना सुचली व लॅमिनेटेड काचेचा जन्म झाला.
आता जवळ-जवळ साठ वर्षे ही काच वाहन उद्योगात वापरली जात आहे. सुरक्षेच्या सर्वात महत्वाच्या फायद्याबरोबरच ह्या काचेचे काही अन्य फायदेही आहेत. रचनेप्रमाणे मधला थर प्लॅस्टिकचा असल्यामुळे ह्या काचेतून आवाज कमी प्रमाणात आरपार होतो त्यामुळे इंजिनचा तसेच बाहेरील अन्य आवाज प्रवासी कक्षापर्यंत साधारणपणे ५० टक्के इतका कमी पोहोचतो. लॅमिनेटेड काचेतील प्लॅस्टिक आवाजाबरोबरच तापमानालाही अवरोध करते. सूर्यप्रकाशात असलेली इन्फ्रारेड किरणे या काचा ९९ टक्के इतकी परावर्तित करतात. परिणामत:कारमधील तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा थोडेसे कमी राहाते.
परंतु वाहनाच्या सर्व काचांमधे लॅमिनेटेड काच वापरण्याचा एक तोटादेखील आहे आणि तो म्हणजे आपत्कालीन सुटकेसाठी होणारा त्रास. लॅमिनेटेड काचेच्या गुणधर्माचा म्हणजेच लवकर न तुटण्याचा तोटा होतो तो इथे! काच लवकर फुटत नसल्याने गाडीत अडकलेल्या माणसांना बाहेर पडण्यासाठी फार त्रास होतो किंबहुना बरेच वेळा ते शक्य होत नाही व अशा प्रसंगात प्राणहानीही होऊ शकते. यामुळेच गाडीतील सर्व काचांसाठी लॅमिनेटेड काच वापरावी का हा अजूनही वादाचाच मुद्दा आहे! जर काच आतून जलद गतीने व कमी श्रमात फोडण्यासाठी काही सोय करता आली जसे की एखादा हातोडा किंवा तत्सम अवजारकारमध्ये तयार ठेवायला हवे. तसे केले गेले तर तर मात्र सर्व काचांसाठी लॅमिनेटेड काच वापरणे सोयिस्कर व सुरक्षित ठरू शकेल हे नक्की.