मोटारसायकल अर्थात बाईक म्हणजे वेग, पीकअप... असे अनेकांच्या डोक्यात फिट्ट बसलेले समीकरण आहे. मुळात आज बाजारात विविध कंपन्यांच्या बाईक्स व त्यांच्या मॉडेल्सनी पर्याय ठेवले असले तरी अनेकांच्या मनात गोंधळही उडवून टाकला आहे. खरे म्हणजे बाईक्सची खरेदी करणारे ग्राहकही काही वेगळ्या प्रकारचे व मनोवृत्तीचे आहेत. त्यात तरुणवर्ग अधिक आहे व प्रौढही आहेत पण तरुणवर्गामध्ये बाईक्सच्या उपयुक्ततेबाबत, मायलेजबाबत, किंमतीबाबत विचार करणाराही तरुण आहे, तर केवळ बाईक्सचा रूपरंग, पीकअप, ताकद आणि किंमत पाहाणाराही एक तरुणवर्ग आहे. तरुण वर्गामध्ये हे दोन प्रकार प्रामुख्याने दिसतात. तसेच बाईक्सच्या ताकदीबाबतच केवळ भर देणारा एक वर्ग आहे व परदेशी बाईक्सच्या प्रेमातील किंवा त्या प्रकारच्या भारतीय बाईक्स शोधणाराही एक वर्ग आहे.
सर्वसाधारण बाईक्स वापरणारा वर्ग तरुण आहे. सर्वसाधारण चाकरमानी असणारा तरुण प्रामुख्याने मायलेज पाहातो, तर बऱ्यापैकी अधिक कमाई असणारा तरुण मायलेजपेक्षा बाईक्सचा रुबाब, ताकद पाहातो. सर्वसाधारण १०० सीसी ते २०० सीसी क्षमतेच्या इंजिन असणाऱ्या बाईक्स बहुतेक ग्राहक घेतात. तो वर्ग प्रामुख्याने अधिक आहे. भारतीय बाईक्सच्या बाजाराचा विचार करता उपयुक्तता, मायलेज व किंमत या तीन प्रमुख बाबी ग्राहकांना अपेक्षित असतात.
बाईक्स ही प्रामुख्याने डायमंड व ट्युब्यूलर चासीमध्ये तयार केलेली दुचाकी आहे. या दोन भिन्न प्रकारची वैशिष्ट्ये असणारी चासीमध्ये डायमंड चासी प्रामुख्याने आहे ती मोठ्या ताकदीच्या बाईक्समध्ये तर स्कूटरसारखी ट्यूब्यूलर चासी व काही प्रमाणात डायमंड चासीची वैशिष्ट्ये संमिश्रित असलेली भारतीय बाईक्समध्ये दिसतात. बाईक्स घेताना प्रथम पाहावी ती तुम्हाला नेमकी कोणत्या ताकदीची बाईक हवी आहे. मायलेज, मेन्टेनन्स, मटेरिअल या तीन बाबींमध्ये तर तुलना कराच पण त्यापेक्षा सुरक्षितता, तुम्हाला त्या बाईकची ताकद झेपणार आहे का, तिचा वापर करताना तुम्ही स्वतः सुरक्षित चालवू शकाल का, कारण बाईक्सच्या ताकदीमुळे व मोठ्या चाकांमुळे मिळणारी गती नियंत्रित करता आली पाहिजे. नेहमीच्या वापरासाठी दैनंदिन गरज म्हणून ती घेताना तिच्या गतीपेक्षा तिची उपयुक्तता व सुरक्षितता पाहाणे महत्त्वाचे आहे. तसेच कटचासी त्यामध्ये आहे का, ही बाब चालवणार्याच्या आरामदायी व शारिरीक त्रास कमी करण्याच्या दृष्टीने गरजेची आहे. त्यामुळे स्टिअरिंगरॉडद्वारे मिळणारे हादरे वा व्हायब्रेशन्स कमी बसत असतात.
बाईक्समध्ये वापरण्यात येणारे लोखंड हे कोणत्या प्रकारचे आहे, त्याबद्दल एकंदर अन्य लोकांचे अनुभव काय आहेत, त्या बाईक्सचे हेडलॅम्प कसे आहेत व आसनव्यवस्था तुम्हाला कशी हवी आहे. बाईक्सच्या लूकसाठी आसनांची रचना इतकी संकुचित केलेली असते की, त्यावर दोन माणसांना बसणे कठीण होते. तर काही सर्वसाधारण उपयुक्ततावादी बाईक्सच्या आसनांनाही स्लीम करून टाकले आहे, लांबीलाही कमी केले आहे. त्यामुळे ग्राहकाने आपला विचार त्यादृष्टीने करावा हे इष्ट. जास्त मायलेज देत असल्याचा दावाही काही कंपन्या करतात, पण तो दावा मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये फसतो. तेथील वाहतूक कोंडी हे त्याचे प्रमुख कारण आहे. मात्र तरीही त्या वापरण्यासाठी स्वस्त आहेत. स्कूटरसारखे अतिरिक्त सामान वाहून नेता येत नसले तरी सर्वसाधारण कार्यालयात जाणाऱ्या सॅक होल्डर्सना त्या आता कम्फर्टेबल वाटतात. कंपन्यांच्या भिन्न बाईक्सच्या किंमतीचा व गुणाचा पूर्ण आढावा घेऊन तुमची आर्थिक, शारिरीक क्षमता तसेच वेग की उपयुक्ता ही नेमकी गरज ओळखून बाईक्सची निवड करावी हे उत्तम