Tesla Elon Musk, Mahavikas Aaghadi: जगातील प्रसिद्ध ई-वाहन उत्पादन कंपनी ‘टेस्ला’ने गेल्या काही महिन्यात जगभरात चांगलंच नाव कमावलं आहे. पण टेस्ला कार भारतात आणण्यासाठी शासकीय पातळीवर विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या कारणामुळे टेस्लाला भारतात येण्यास उशीर होणार असल्याचं ‘टेस्ला’चे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क यांनी सांगितलं. त्यानंतर तेलंगणाकडून एलॉन मस्क यांना आमंत्रण देण्यात आलं. तशातच आता टेस्लाचं उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्रात या, असं आमंत्रण महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत एलॉन मस्क यांना महाराष्ट्रात येण्यासाठी आमंत्रण दिले. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं. सध्या सुप्रसिद्ध टेस्ला कारचं आबालवृद्धांना आकर्षण आहे. ही कार भारतात कधी लाँच करणार असा प्रश्न ट्विटरवर एकाने विचारला होता. त्यावेळी एलॉन मस्क यांनी भारतात टेस्ला आणण्यासाठी काही शासकीय नियमांच्या समस्या उद्भवत असल्याचं लिहिलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करत त्यांना महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं.
महाराष्ट्र हे भारत देशातील एक अतिशय प्रगत असं राज्य आहे. तुमच्या व्यवसाय उभारणीसाठी तुम्हाला महाराष्ट्रात जी काही मदत लागेल ती संपूर्ण प्रकारची मदत करण्यासाठी आमचं राज्य सक्षम आहे. तुमच्या सुप्रसिद्ध टेस्लाचा भारतात जम बसवण्यासाठी महाराष्ट्र सरकार तुम्हाला आवश्यक ते सहकार्य नक्कीच करेल. तुम्ही टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट महाराष्ट्रात उभारू शकता, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी एलॉन मस्क यांच्यासाठी महाराष्ट्राची दारं उघडी असल्याचं स्पष्ट केलं.
तेलंगणाकडून एलॉन मस्क यांना काय आहे संदेश
तेलंगणाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री केटी रामाराव यांनी मस्क यांच्या ट्वीटला उत्तर दिलं होतं. "मी भारतातील तेलंगणा राज्याचा उद्योग मंत्री आहे. देशात किंवा तेलंगणात प्रकल्प उभारण्यासाठी तुम्हाला जी आव्हानं येत असतील ती दूर करण्यासाठी मदत करण्यास आम्हाला आनंद होईल. राज्य अनेक शाश्वत उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. तेलंगणा राज्यात व्यावसायिकदृष्ट्या प्रगत तंत्रज्ञान आहे", असं ट्वीट करण्यात आलं होतं.