ऑटोमोबाईल क्षेत्रावर गेल्या तीन-चार वर्षांपासून संकट कोसळले आहे. आता कुठे सारे रुळावर येत आहे. बीएस ४ ला जास्त दिवस झालेले नसताना अचानक बीएस ६ ची वाहने आणण्याचा दबाव, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि जगाला हादरविणारा कोरोना अशा तिहेरी संकटात वाहन उद्योग अडकला होता. यातच हा सर्व्हे बड्या बड्या कंपन्यांची झोप उडविणारा आहे.
जवळपास ८२ टक्के लोकांनी कोरोना महामारीमुळे कार खरेदी करण्याचा निर्णय बदलला होता. मोबिलिटी आऊटलूकने केलेल्या या सर्व्हेनुसार इलेक्ट्रीक वाहनांकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याने जवळपास ४० टक्के लोकांना इलेक्ट्रीक दुचाकी वाहन खरेदी करायचे आहे. २०२१ मध्ये हा आकडा ३७ टक्के होता.
गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही ३३ टक्के लोक ईलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत. सर्व्हेमध्ये सांगितले गेले आहे की, वाहन खरेदीचा निर्णय टाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचा अर्थ कोरोनाच्या संकटातून वर येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे.
इलेक्ट्रीक वाहनांबाबत काय वाटते...सर्व्हेनुसार ग्राहकांना आता ईलेक्ट्रीक वाहनांवर विश्वास बसू लागला आहे. त्यांना आता वाटत आहे की, पेट्रोल, डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रीक वाहने देखील चांगले काम करत आहेत. तसेच परवडणारा प्रवास देखील होत आहे. ई वाहनांसाठी लोकांना खर्च देखील खूप करावा लागणार नाही. मात्र, चार्जिंग सुविधांबाबत अद्याप या ग्राहकांना विश्वास वाटत नाहीय. ४९ टक्के लोक ऑनलाईन द्वारे वाहन खरेदी करू इच्छित आहेत.