मध्यंतरी दिल्लीमध्ये रस्त्यांवर वाहन चालकांसाठी लावण्यात आलेल्या संकेत फलकांच्या त्रुटीपूर्ण पद्धतीचा शोध लागला होता. दिल्लीमध्ये थोडेथोडके नव्हेत तर तब्बल ७० टक्के संकेतफलक हे असे त्रुटीपूर्ण आढळून आले होते. त्यावर उपाय म्हणून दिल्ली प्रदेश सरकारच्या संबंधित विभागातील अभियंत्यांना रस्त्यांवर योग्य पद्धतीने व योग्य स्थळी संकेतफलक कसे लावावेत, यासाठी एक कार्यक्रमच आखण्यात आला त्या अनुषंगाने त्यातील ५० अभियंत्यांना फरिदाबाद येथील वाहतूक प्रशिक्षण केंद्रामध्ये संकेत फलक कसे लावावेत यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानिमित्ताने या फलकांचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे असे वाटते. अर्थात अजूनही अनेक ठिकाणी असे फलक सुयोग्य व चांगल्या स्थितीत असण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.
रस्ते वाहतुकीमध्ये वाहनचालकांना मार्गदर्शन करणारी ही संकेत चिन्हांची आवश्यकता असते. त्यासाठी अशा प्रकारच्या संकेत फलकांवरील अक्षरे, चिन्हे कशी व कोणत्या आकारात असावीत, ते फलक कोणत्या ठिकाणी, किती उंचीवर असावेत, त्यांचा रंग कसा असावा, रस्त्यांच्या स्थितीनुसार हे संकेतफलक लावले जाताना त्याचा अर्थ नेमका व अचूक असावा हे महत्त्वाचे असते. थोडक्यात रस्ते निर्माण वा दुरुस्ती काम करणाऱ्या या अभियंत्यांना या साऱ्या बाबींचे ज्ञान असलेच पाहिजे. केवळ अभियंतेच नव्हेत तर तेथील सर्वसाधारण कंत्राटदार, त्याचे शिक्षित कर्मचारी यांनाही त्याची माहिती देणे गरजेचे असते. त्यांच्याकडूनच प्रत्यक्षात हे फलक लावले जात असतात. किंबहुना काहीवेळा त्या फलकांची रस्त्याच्या स्थितीनुसार झालेल्या बदलांबाबतची माहिती सर्वप्रथम तेथील कामगारांना आधी कळू शकते व एखादा फलक राहून गेला असेल तर किंवा एखादा फलक चुकीचा आला असेल तर तो बदलण्याची सूचना तो कर्मचारी संबंधितांना करू शकतो.
मुळात हे संकेत फलक वाहन चालकांना अतिशय मोलाचे ठरत असतात. रस्त्यांच्या वळणांबाबत, ओव्हरटेक करू नका, अरूंद मोऱ्या, पूल, शाळा, गाव, आदी विविध बाबींची माहिती वाहनचालकाला आधी मिळणे गरजेचे असते व ते काम हे संकेत फलक करीत असतात. मात्र अनेकदा या फलकांवर राजकीय पक्षांचे बॅनरही लागतात, तर कधी गावातील लग्नसमारंभाच्या आमंत्रण फलकाचाही समावेश होतो. कधी झाडांमागे वा झाडांच्या पानांमागे हे फलक लपले जातात तर कधी त्यांची स्थिती खराब होते, गंजते, तुटते रंग नाहीसा होतो. अशामुळे हे फलक पूर्णपणे कुचकामी ठरतात. या फलकांची गरज खरे म्हणजे या प्रत्येक विभागाने जशी ओळखली पाहिजे, तसेच वाहनचालकांनीही व नागरिकांनीही जाणली पाहिजे.
आपण बाहेरगावी जाताना जर फलक दिसले नाहीत, खराब झालेले दिसले तर सूज्ञ नागरिक म्हणून त्याची दखल घेऊन त्याची माहिती देणारे किमान एक पत्र तरी वाहतूक विभागापर्यंत पोहोचवा. न जाणो त्यामुळे एखादा संभाव्य अपघात त्यामुळे टळू शकेल. महाराष्ट्रातही अशा प्रकारचे त्रुटीपूर्ण फलक वा फलक नसण्याचे प्रकार दिसून येतात. त्यांची पूर्ण व योग्य पद्धतीने स्थापना होणे गरजेचे आहे. फक्त त्यासाठी सर्वांचे प्रयत्न व सूचना होणेही गरजेचे आहे.