जुनी कार विकण्यासाठी आता तुम्हाला एजंट किंवा ओएलएक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांना सारखी कार दाखविण्याची गरज नाही. कारण मारुती सुझुकीने नवी योजना आणली आहे. याद्वारे जुन्या कारचे मालक त्यांची कार घरबसल्या विकू शकणार आहेत.
मारुतीचे ट्रू व्हॅल्यू असे हे जुन्या कार खरेदी विक्रीचे दालन आहे. स्थानिक एजंट, ओएलएक्स आणि ऑनलाईन कार खरेदी विक्री वेबसाईटमुळे मारुतीच्या या ट्रू व्हॅल्यूला मोठा फटका बसत होता. चांगल्या वापरलेल्या जुन्या कार अन्य प्लॅटफॉर्मवरून विकल्या जात असल्याने मारुतीनेही नवी योजना आणली आहे.
आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सद्वारे मारुतीने कार मालकांना ही सुविधा देऊ केली आहे. यासाठी व्हेईकल बाईंग या नावाने सेवा सुरु करण्यात आली असून मालक घरबसल्या त्यांच्या कारचे मुल्यांकन डिजिटल पद्धतीने करू शकणार आहेत. यामुळे किंमत ठरविण्यामधील पारदर्शकताही मालकांना मिळणार आहे. तसेच कारचे लगेचच पैसेही मालकाला दिले जाणार आहेत. यामुळे कार मालकाला ग्राहक शोधणे, कागदपत्र हस्तांतर, पैसे घेणे आदी कटकटींपासून सुटका मिळणार आहे.
वाहन बाजारात मंदी असल्याने सेकंड हँड कार खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मारुती सुझुकीने यंदाच्या आर्थिक वर्षात 4 लाखांहून जास्त वापरलेल्या कार विकल्या आहेत.