सध्या इलेक्ट्रिक कार जगभरात लोकप्रिय होताना दिसत आहेत. भारतातही इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे. अनेक भारतीय कंपन्यांनी कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. इलेक्ट्रिक कार एवढ्या स्वस्त झाल्या आहेत की, आता आपण 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत चांगल्या रेंजची इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. यातच आता, स्कोडा ऑटो देखील भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे.
भारतासाठी आपण लवकरच मास मार्केट इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहोत, अशी घोषणा कंपनीने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. भारतातील भविष्यातील मोबिलिटी लक्षात घेत, इलेक्ट्रिक कारच्या रणनीतीचा विस्तार करण्याचा स्कोडा ऑटोचा मानस आहे.
एन्याक असू शकते पहिली इलेक्ट्रिक कार - स्कोडा एन्याक (Skoda Enyaq) कंपनीची ग्लोबल इलेक्ट्रिक कार आहे. कंपनी आधिपासूनच अनेक देशांमध्ये या कारची विक्री करत आहे. स्कोडा ऑटोचे सेल्स अँड मार्केटिंग बोर्डाचे सदस्य मार्टिन जॉन यांनी म्हटले आहे की, कंपनी भारतात एंट्री लेव्हल BEV आणण्याचा विचार करत आहे. तसेच कंपनी आपली प्रीमियम एंट्री-लेव्हल Enyaq EV भारतात लॉन्च करन्यावर लवकरच निर्णय घेऊ शकते. याशिवाय, किंमत कमी ठेवण्यासंदर्भात कंपनी स्थानिक निर्मात्यांसोबत भागिदारीत इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यावरही विचार करू शकते.
टाटा-महिंद्राचं टेन्शन वाढणार - भारतातील पॅसेन्जर इलेक्ट्रिक वाहन बाजारावर टाटा आणि महिंद्रा सारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, स्कोडाने भारतीय बाजारात कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार लॉन्च केली, तर स्कोडाचा सामना थेट टाटा आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार्स सोबत असेल. याशिवाय स्कोडाचा सामना ह्युंदाई आणि एमजीच्या इलेक्ट्रिक कार्ससोबतही असू शकतो.