मोटारसायकलीला सामान वाहून नेण्याची सुविधा फार नसते. मात्र त्यासाठी मोटारसायकलीच्या वेगवेगळ्या भागाला पिशव्या अडकवल्या जातात, बॅगा लटकावतात. वास्तविक कशाही पद्धतीने त्या लटकावल्याने ड्रायव्हिंग करतानाही त्रास होतो, मागे बसलेल्यांनाही त्रास होतो. महिलांना मागे बसताना हात धरायलाही जागा उरत नाही. मोटारसायकलीवर बसणाऱ्या महिलांना मागे बसल्यानंतर हात नीटपणे व घट्ट धरून बसता यावे, यासाठी एक चांगली एक्सेसरी बाजारात मिळते. मोटारसायकल विकत घेताना कंपनीकडून ती काही दिली जात नाही.
अर्थात अनेक सामग्री कंपनीफिटेड नसतात, त्यांची व्यवस्था तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार करावी लागते. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनांची फेरफटका मारून चौकशी केली तर अनेक वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला बाजारात दिसून येतील. लेडीज हॅण्डल या नावाने ओळखली जाणारी ही सामग्री तुम्हाला मोटारसायकलीला हुकासारखी नटद्वारे लावावी लागते. सस्पेंशनच्या नटलाच ती जोडता येते. त्याला लंबवर्तुळाकार आकाराची एक साधी रचना असते व ती मोटारसायकलीला अंगभूत आहे अशी वाटावी इतकी फीट बसते.
त्याचा उपयोग हा जसा मागे बसणाऱ्या महिलेला वा पुरुषालाही घट्ट धरून बसण्यासाठी होतो तसाच छोटी पर्स, पिशवी लटकवण्यासाठीही होतो. मोटारसायकल पार्किंगमध्ये उभी करताना स्टँडवर लावावी लागते, तेव्हाही या हॅण्डलचा आधार घेता येतो. मोटारसायकलस्वाराच्या डाव्या बाजूला व मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या दरम्यान हे हॅण्डल प्रामुख्याने लावले जाते. दोन्ही बाजूलाही ते लावता येते. पण साधारणपणे ते एकाच बाजूला व खास करून डाव्या बाजूला ते लावले जाते. एक छोटीशी पण तशी उपयुक्त असणारी ही सामग्री आहे.