देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने महिन्याला सव्वा ते दीड लाख कार विकण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे ही मागणी कंपनीला पूर्ण करता येत नसल्याने कार बुक करणाऱ्या ग्राहकांना वेटिंग करावे लागते. यामुळे मारुतीने तिसरी फॅक्टरी उघडण्याची तयारी सुरु केली आहे.
मारुती उत्पादन क्षमता वाढविणार आहे. हरियाणात कंपनी तिसला प्लांट सुरु करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. स्थानिक मागणीसह एक्स्पोर्टची देखील मागणी पूर्ण करण्यासाठी हा नवीन प्लांट सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे.
हरियाणाच्या खारखोडामध्ये हा प्लाँट उघडला जाणार आहे. यासाठी कंपनीने ७,४१० कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखली आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता दरवर्षी २.५ लाख असेल असे सांगितले जात आहे. हा आकडा जरी मारुतीच्या महिन्याच्या खपाच्या आकड्याच्या दीड पट असला तरी हा प्लांट सुरु झाल्यावर त्याचा विस्तार केला जाणार आहे. ही क्षमता साडे सात लाख युनिट एवढी होण्याची शक्यता आहे. नवीन प्लांट २०२९ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.
याचठिकाणी मारुतीचा दुसरा प्लांट कार्यन्वित झाला आहे. मारुतीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक कार येत आहेत. यामुळे कंपनीला मोठी मागणी नोंदविली जाणार आहे. मारुती ब्रेझाची निर्मिती या दुसऱ्या प्लांटमध्ये सुरु करण्यात आली आहे. या उत्पादन केंद्रासाठी कंपनीने आयएमटी खारखोडामध्ये ९०० एकर जमीन संपादित केली आहे.मारुती सुझुकी हरियाणामधील मानेसर आणि गुरुग्राम प्लांटमधूनही वाहने बनवते. आता हा तिसरा प्लांट मारुतीच्या क्षमतेचा विस्तार करणारा आहे.