उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून महिंद्रा कंपनी आणि उद्योगपती आनंद महिंद्रांसाठी वाईट खबर येत आहे. एका व्यक्तीने महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कंपनीच्या १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कानपूरच्या रायपूरवा पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनुसार राजेश यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला त्यांनी महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही गिफ्ट केली होती. १४ जानेवारी, २०२२ ला त्यांचा मुलगा मित्रांसोबत लखनऊहून कानपूरला येत होता. धुक्यामुळे त्याची कार डिव्हायडरवर आदळली होती. यात अपूर्वचा मृत्यू झाला होता.
महिंद्राच्या तिरुपती ऑटोमधून ही कार खरेदी करण्यात आली होती. मुलाने सीटबेल्ट लावला होता तरी कारच्या एअरबॅग उघडल्या नाहीत. तसेच फसवून आपल्याला ही कार विकली गेली असा आरोप त्यांनी केला आहे. कारची योग्यरित्या तपासणी केली असती तर त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला नसता, असा त्यांनी महिंद्रांवर आरोप ठेवला आहे.
यावर बोलताना राजेश यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अभद्र वागणूक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजेश यांच्या दाव्यानुसार त्यांनी फॉल्टी कार शोरुमच्या समोर आणून उभी केली आहे. कंपनीने कारमध्ये एअरबॅगच लावल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजेश यांनी कोर्टाच्या माध्यमातून हा खटला दाखल केला आहे.