नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलची होणारी दरवाढ तसेच प्रदुषणावर उपाय म्हणून भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे काम सरकारकडून दिले जात आहे. अनेक बड्या आघाडीच्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने सादर करण्यास सुरुवात केली आहे. अशातच मुंबईतील एका स्टार्टअप कंपनीने तीनचाकी इलेक्ट्रिक कार तयार केली असून, लवकरच ती लाँच केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ही इलेक्ट्रिक कार केवळ ४.३ लाख रुपयांमध्ये सादर केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. (strom r3 will be the cheapest electric car in indian market in just 4.3 lakh rupees)
टाटा नेक्सॉनपासून ते आंतरराष्ट्रीय ब्रँड टेस्लापर्यंत अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या सर्वांच्या किमती १० लाखांपासून सुरू होतात. अशातच मिनी इलेक्ट्रिक कार असलेली Strom R3 ही गाडी केवळ ४.३ लाख रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. याच प्राइज रेंजमध्ये ही इलेक्ट्रिक कार लाँच झाल्यास ती भारतातील सर्वांत कमी किमतीची इलेक्ट्रिक कार ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.
Strom R3 ची वैशिष्ट्ये
मुंबईतील स्टार्टअप कंपनी Storm Motors ने आपली मिनी इलेक्ट्रिक कार Strom R3 च्या प्री-बुकींगला सुरुवात झाली असून, या कारच्या बुकिंसाठी केवळ १० हजार रूपये भरावे लागणार आहेत. Strom R3 ही दोन दरवाजे असलेली आणि तीन चाकी कार आहे. या कारमध्ये पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला एक चाक आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा शहरांसाठी ही कार तयार करण्यात आली आहे. कंपनीनं मस्क्युलर लूकसह यात LED लाईट्स, ड्युअल टोन आणि सनरूफही दिले आहे.
सिंगल चार्जवर २०० किमी धावणार
एका चार्जमध्ये ही कार २०० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही कार चालवण्याचा खर्च ४० पैसे प्रति किलोमीटर आहे. ही कार तीन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात येईल. त्यानुसार त्यांची ड्रायव्हिंग रेंजही बदलेल. यामध्ये १२० किमी, १६० किमी आणि २०० किमी अशी ड्रायव्हिंग रेंज आहे. Strom R3 तीन रंगांमध्ये उपलब्ध असून यात इलेक्ट्रिर ब्ल्यू, नियॉन ब्ल्यू आणि रेड-ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.
घरातूनही चार्ज करता येणार!
Strom R3 मध्ये कंपनीने 13 kW क्षमतेच्या हाय एफिशिअन्सी मोटरचा प्रयोग केला आहे. जो 48Nm चा टॉर्क जनरेट करतो. याव्यतिरिक्त यासोबत एक फास्ट चार्जर देण्यात आला असून याच्या मदतीनं कार केवळ दोन तासांमध्ये ८० टक्के चार्ज होते. या कारला संपूर्ण चार्ज होण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो. तसेच घरातील १५ अॅम्पिअर क्षमतेच्या घरातील सॉकेटमधूनही ही कार चार्ज करता येऊ शकते.