कार नवीन असताना लोक तिची काळजी घेतात. नंतर नंतर तिच्याकडे स्टार्ट होतेय ना मग झाले, चालतेय ना मग झाले असे करत कानाडोळा करतात. अशातच उन्हाळा सुरु होतो आणि मग त्यांची कार कधीतरी आग ओकू लागते. उन्हाळ्यात वाहनांना आग लागण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. या प्रसंगातून कसे वाचवावे...
कार मालकांच्या निष्काळजीपणामुळे कारना आग लागते. यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या तुमच्या कारला आगीपासून वाचवितील हे पाहुया.
कोणत्याही कारला आग लागण्याची सर्वाधिक शक्यता ही शॉर्ट सर्किटमुळे असते. जेव्हा उष्णतेमुळे कारमधील वायरच्या बाहेरील आवरण वितळते, तेव्हा या वाय़र एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते. अशावेळी आग लागू शकते. यामुळे कारच्या वायरिंगची एकदा जरूर तपासणी करावी.
कारच्या इंजिनचे तापमान वाढले तर ओव्हरहीटमुळे आग लागण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्यात लांबच्या किंवा चढणीच्या प्रवासावेळी, ट्रॅफिकमध्ये अनेकदा इंजनचे तापमान वाढते. यामुळे आग लागण्याची शक्यता असते. यासाठी काही किमी चालविल्यानंतर कार थांबवावी. तसेच कारचे कुलंट देखील तपासावे.
ज्या गरजेच्या नाहीत त्या अॅक्सेसरीज कारमध्ये फिट करू नयेत. अनेकदा कारचे वायरिंग कापून तिथे हेडलाईट किंवा अन्य गोष्टी जोडल्या जातात. यामुळे कार जळण्याचा धोका असतो. तसेच ही अॅक्सेसरी काय क्वालिटीची आहे यावरही बऱ्याच गोष्टी ठरतात. यामुळे कंपनी जशी कार देते तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे वॉरंटीही टिकून राहते.
जर कारला आग लागण्याच्या धोक्यापासून वाचायते असेल तर कारमध्ये परफ्युम किंवा अन्य कोणत्याही स्प्रे आत ठेवता नये. या वस्तू लगेचच आग पकडतात. हे पदार्थ अत्यंत ज्वलनशील असतात. उष्णतेमुळे ते फुटू शकतात. याचीही काळजी घ्यावी, तसेच कार जास्तीत जास्त सावलीत लावण्याचा प्रयत्न करावा.