गेल्या काही वर्षांमध्ये एसयूव्ही (SUV) हा वाहनातील प्रकार चांगलाच वाढीला लागला आहे. वाढीला लागला आहे असे म्हणण्याचे कारण की पूर्वीपेक्षा जास्त प्रकारच्या व कंपन्यांच्या एसयूव्हींचे पर्याय ग्राहकांसमोर आहेत. साधारणपणे एसयूव्ही ( SPORT UTILITY VEHICLE) ही स्टेशनवॅगन या प्रकारातील कार असून जीपसारख्या दणकट वाहनाकडे झुकणारी एसयूव्ही आज मात्र कारइतकाचा सुखदायी प्रवास व ड्राइव्ह कम्फर्ट देणारी आहे. काही कंपन्यांच्या एसयूव्हीनी तर भारतातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या गाड्या म्हमून छाप बसवून घेतली आहे. किबंहुना त्यामुळे काही ग्राहक त्या एसयूव्हीपेक्षा अधिक वेगळ्या लूकच्या एसयूव्ही पाहायला लागले व त्यातच एसयूव्ही लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने टुरिस्टसाठीही त्यांचा वापर होऊ लागला. अशामुळे त्या एसयूव्हीमध्ये अधिकाधिक संशोधन होऊन त्यातही उच्चश्रेणीच्या एसयूव्ही काही कंपन्यांनी बाजारात आणल्या. उच्चपदस्थ अधिकारी उच्चभ्रू वर्गातील लोकांनाही सेदानपेक्षा एसयूव्ही अधिक आवडू लागल्या. सेदानकडून अनेकजण एसयूव्हीकडे वळू लागले.
लांब, रूंद, दणकट, डिझेल इंधनामुळे शक्तीशाली व लांबच्या प्रवासासाठी आवश्यक जागेमुळे जास्त प्रवासी नेणारी कौटुंबिक वापरासाठीही उपयुक्त वाटू लागली. किंबहुना सेदानच्या वापराकडूनही एसयूव्हीसाठी ग्राहक वळू लागले आहेत. मात्र काही झाले तरी एसयूव्ही ही लांबच्या प्रवासासाठी अधिक सुविधाजनक, आरामदायी करण्यात आलेली आहे हे नाकारता येणार नाही. ग्राहकांच्या मागमीनुसार एसयूव्ही अधिकाधिक विकसित केल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्या टू व्हील ड्राइव्हवरून फोर व्हील ड्राइव्ह पद्धतीमधीलही तयार करून विविध प्रकारच्या रस्त्यांवरही उपयुक्त करण्यात आल्या आहेत. स्टेशनवॅगनला दिलेले हे एसयूव्हीचे स्वरूप भारतामध्ये आता चांगलेच रूजू लागले आहे. प्रामुख्याने डिझेल इंधनावर चालणाऱ्या एसयूव्हीमुळे पेट्रोलपेक्षा कमी किंमतीचे व शक्तिशाली असे इंधन मोटारीच्या ताकदीला साजेसे व समर्पक वाटते. आतमधील आरामदायी आसन रचना, तीन व दोन रांगाच्या आसनव्यवस्थेमध्ये सामानालाही जागा चांगली मिळते. तीन रांगाच्या आसनव्यवस्थेत काही चांगल्या आरेखनाद्वारे आसनाची तिसरी म्हणजे सवार्त मागची आसनरांग मोल्डेबल केलेली दिसते. तसेच काहींमध्ये आसनांच्या पाठीचा भागही मागे करता येऊन एअरलाइन कम्फर्ट देण्यात येतो, त्यामुळे एक- दोन व्यक्ती छानपैकी झोपूही शकतात. अंतर्गत सुविधांवर दिलेला भर, प्रभावी वातानुकूलित यंत्रणा, जास्त ताकद, डिझेलसारखे किफायती इंधन यामुळे एसयूव्ही लोकप्रिय झाली आहे. एसयूव्हीचा लूकही इतका स्वीकारला गेला आहे की, काही कंपन्यांनी भारतामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही या प्रकारालाही जन्माला घातले आहे. एसयूव्हीची ही उपयुक्तता व पॉश लूक यामुळे शहरी वापरामध्येही शोफर ड्रिव्हन कार वापरकर्त्यांनीही एसयूव्ही स्वीकारल्याचे चित्र आहे. हेच एसयूव्हीचे यश म्हणावे लागेल.