नवी दिल्ली-
मारुती सुझुकीनं ऑटो एक्स्पोमध्ये आपली लोकप्रिय ऑफरोडिंग एसयूव्ही Jimny सादर केली. अतिशय आकर्षक लूक आणि दमदार इंजिन पावरनं सज्ज असलेल्या या एसयूव्हीची बऱ्याच महिन्यांपासून ग्राहक वाट पाहात होते. कंपनीनं अखेर ही कार फाइव्ह-डोअर व्हर्जनमध्ये लॉन्च केली. एक्स्पोमध्येच या एसयूव्हीसाठीचं बुकिंग अधिकृतरित्या सुरू केलं गेलं. कंपनीनं आतापर्यंत जवळपास २२ हजार युनिट्सचं बुकिंग केल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप कारच्या किमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही आणि ही एसयूव्ही अधिकृतरित्या भारतात लॉन्च देखील झालेली नाही. पण याआधीच सुझुकीनं ऑस्ट्रेलियन बाजारात Suzuki Jimny चं नवे हेरिटेज एडिशन लॉन्च केलं आहे.
नावानुसारच कंपनीनं हेरिटेज एडिशन कारला रेट्रो लूक आणि डिझाइन दिलं आहे. सुझुकी जिम्नीला जुना इतिहास आहे. कंपनीनं ७० च्या दशकात पहिल्यांदा ही कार सादर केली होती आणि गेल्या पाच दशकांपासून या एसयूव्हीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. १९७०,८० आणि ९० च्या दशकातील जिम्नीची ऑफ-रोड ओळख पुन्हा मिळवून देण्यासाठी सुझुकी ऑस्ट्रेलियानं जिम्नीच्या हेरिटेज एडिशनला खास रेट्रो-थीमच्या ग्राफिक्समध्ये लॉन्च केलं आहे. यात कारवर भगव्या आणि लाल रंगाच्या स्ट्रीप्स पाहायला मिळत आहेत.
रेट्रो ग्राफिक्ससह रियर फेंडरवर जिम्नी हेरिटेज डेकल देखील देण्यात आलं आहे. याशिवाय जिम्नीमध्ये पांढऱ्या रंगात सुझुकीचा लोगोसह रेड मड फ्लॅप देखील देण्यात आळा आहे. कंपनीनं हेरिटेज एडिशन फक्त चार रंगात सादर केली आहे. यात पांढरा, फॉरेस्ट ग्रीन, ब्लूश ब्लॅक पर्ल आणि मीडियम ग्रे यांचा समावेश आहे.