स्वाईप कंपनीने आपला एलीट व्हिआर कनेक्ट हा फोर-जी नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,४४९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध केला असून यासोबत व्हिआर हेडसेट देण्यात येत आहे.
स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट हे मॉडेल भारतीय ग्राहकांना शॉपक्लुज या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात ७२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेक एमटी ६७३७ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे रिलायन्सच्या जिओसह अन्य सेवांसाठी हे मॉडेल वापरता येणार आहे. तर उर्वरित कनेक्टिव्हिटींच्या पर्यायांमध्ये वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस आदी पर्याय असतील. या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती मल्टी-टास्कींगसाठी उपयुक्त असल्याचा कंपनीने दावा केला आहे. हे मॉडेल ब्लॅक, ग्रे, गोल्ड आणि रेड या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.
नावातच नमूद असल्याप्रमाणे स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या मॉडेलमध्ये व्हिआर म्हणजेच व्हर्च्युअल रिअॅलिटीला (आभासी सत्यता) संलग्न करण्यात आले आहे. या अनुषंगाने यासोबत एक व्हिआर हेडसेटदेखील प्रदान करण्यात आला आहे. काही फ्लॅगशीप मॉडेलसोबत व्हिआर हेडसेट देण्यात येत असतो. या पार्श्वभूमिवर अतिशय किफायतशीर मूल्य असणार्या स्वाईप एलीट व्हिआर कनेक्ट या मॉडेलसोबतही व्हिआर हेडसेट देण्यात असल्याची बाब लक्षणीय आहे. अर्थात हा या मॉडेलच्या विक्रीचा सेलींग पॉइंटदेखील बनू शकतो.