सुगंधित वातावरण, डॅशबोर्डवर आपल्या धार्मिकतेनुसार असलेली तसबीर, चिन्ह किंवा मूर्ती, त्यापुढे उदबत्तीचे घर असा जामानिमा अनेकांच्या कारमध्ये असतो. ट्रकचालकांचे वा बसचालकांचे केबिन म्हणजे काहीवेळा देवालयच वाटावे इतके सजवलेले असते. हे सारे करताना उदबत्ती लावणे व त्या उदबत्तीचा छानसा गंध दरवळत ठेवणेही काहींना नव्हे तर अनेकांना लुभावणारे असते. सगळे कसे छान वाटले तरी उदबत्तीचा वापर करताना खूप जपून करावा, हे सांगायची वेळ येते. विशेष करून त्याला अनेक कारणे आहेत. कोणाला सुगंधित वातावरणापासून वंचित करावे हा यामागचा हेतू नाही. काहींना तर कोणत्याच प्रकारचा गंध कारमध्ये नको वाटतो. सुगंध हा तसा मनाला भावणारा प्रकार आहे यातूनच उदबत्ती, धूपकांडी, इसेन्स, अत्तर, स्प्रे असे प्रकार तयार झाले. त्यामुळे त्यांचा वापर केवळ घरात, कार्यालयात, दुकानात, गॅरेजमध्येच नव्हे तर वाहनांमध्येही होणे तसे स्वाभाविक होते. कोणी म्हणेलही इतके वर्ष आम्ही गाडीत उदबत्ती लावीत आहोत, आम्हाला काही समस्या नाही. पण समस्या कधी उद्भवेल ते सांगता येत नाही. यासाठी जरी एखादा छंद, आवड जोपासायची असली तरी तिचा आस्वाद घेताना आपण काही धोके स्वीकारत नाही. उदबत्ती घरामध्ये लावल्यानंतर सुगंधासाठी सतत हातामध्ये घेऊन फिरत नाही की, स्प्रे आवडतो म्हणून सतत अंगावर वा हवेत मारत बसत नाही. त्याचप्रमाणे कारमध्ये डॅशबोर्डवर अनेकांच्या आवडीनसुरा असलेल्या देवदेवतांच्या मूर्तीपुढे उदबत्ती हमखास लावण्याचा प्रघात पाडला गेला आहे. सुवासासाठी नव्हे तर देवापुढे उदबत्ती लावयाची, गाडी सुरुवात करताना उदबत्ती लावयाची अशा सवयी दिसून येतात. काहींना सुवासासाठी उदबत्ती लावायला आवडते. हे सारे ठीक तरी अनेक बाबतीत सावधानता त्यामध्ये बाळगायला हवी. डॅशबोर्डवर असलेल्या उदबत्तीच्या घरात जरी उदबत्ती वा धूपकांजडी लावली असली तरी ती उघडी असते. त्यातून एखादी ठिणगी उडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकाराने बसलेल्या प्रवाशाच्या कपड्यावर वा सीटच्या कव्हरवरही ते पडून नुकसान होण्याची, अगदी आग लागण्याचीही शक्यता असते. उदबत्तीसाठी काहीजण कुठेही जागा शोधतात. डॅशबोर्डच नव्हे तर दरवाजाच्या बाजूलाही कुठेतरी खोचून उदबत्ती लावलेली दिसते. मुळात पेट्रोल, सीएनजी, एलपीजी, डिझेल अशा इंधनावर चालणाऱ्या तसेच ग्रीस, ऑइल यांच्याशी संपर्क असलेल्या कारमध्ये अशी बेफिकीरी कामाची नाही. काही ठिकाणी डॅशबोर्डवर वेगळेच मखमली कापडी वा केसाळ वाटणारे टर्किश आच्छादनही घातलेले असते. सीट्सही तशा असतात, अशावेळी उदबत्ती लावताना सावधान. पेट्रोलपंपावर जाताना तरी किमान उदबत्ती पेटलेली असू नये. उदबत्ती डॅशबोर्डवर उदबत्तीच्या घरात जरी लावलेली असली तरी त्याखाली एक स्टील वा पितळेची तरी ताटली ठेवा. मुळात उदबत्तीचा वापर चालत्या कारमध्ये करू नये. वातानुकूलीत यंत्रणा चालू असतानाही करू नये. सुवासासाठी अन्य विविध साधने आहेत. तरीही उदबत्तीची हौस असणाऱ्यांनी कार सुरू करण्यापूर्वी काही वेळ उदबत्ती लावून ती विझल्यानंतर प्रवासाला सुरुवात करावी, ते केव्हाही चांगले. पेट्रोलपंप, सीएनजी पंप अशा ठिकाणी असताना तर त्याचा वापरही नको. सिगरेटही कार चालवताना शक्यतो शिलगावू नये, ओढूही नये. त्यामुळेही अनेक धोके निर्माण होत असतात. कारच्याबाहेर हात काढून सिगरेट फेकणे, किंवा राख झाडणे यामुळे दुसऱ्यालाही इजा होण्याचा संभव असतो. तेव्हा कार वापर करताना अशा प्रकारच्या घातक वर्तनाला जाणीवपूर्वक टाळा. सुगंधासाठी एअरफ्रेशनर, अत्तर, स्प्रे, नॅप्थॅलिनच्या सुगंधी गोळ्या, छानपैकी मोगर्याचा गजरा वा सुवासिक फूल ठेवायला काहीच हरकत नाही.
कारमध्ये उदबत्तीचा सुगंध घ्यावा जरा जपूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 5:00 PM