भारतात रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगवर होणा-या अपघातांची व त्यात बळी गेलेल्यांची संख्या कमी नाही. मनुष्यविरहीत लेव्हल क्रॉसिंगच्या ठिकाणी अपघाताची शक्यता जास्त असते. याचे विशेष कारण हे रेल्वे नसून रस्त्यावरून हे लेव्हल क्रॉसिंग पार करताना वाहनचालकांनी दाखवलेली बेपर्वाही व बेफिकिरी हेच आहे. उतावळेपणापायी अनेक चालक आजही मनुष्यविरहीत लेव्हल क्रॉसिंगवर बेदरकारीने रेल्वेरूळ ओलांडत असतात.
लेव्हल क्रॉसिंग म्हणजे रेल्वेचे रूळ व रस्ता हे दोन्ही एकाच स्तरावर असतात, त्या ठिकाणी ते परस्परांना छेद देत असतात व या दोन्ही श्रेणीमध्ये असलेल्या वाहनांचे भिन्नत्त्व असल्याने या लेव्हल क्रॉसिंगला ग्रेड क्रॉसिंग असेही म्हणतात. ज्या ठिकाणी रेल्वे वा रस्ता या एका ठिकाणी आल्याने रेल्वेला प्रथम जाण्याचा अधिकार आपल्या देशात कायद्याने दिलेला आहे. मोटर वाहन कायदा १९८८ व रेल्वे कायदा १९८९ यानुसार रेल्वेगाडीला या ठिकाणी प्रथम जाण्याचा अधिकार आहे. अशा या लेव्हल क्रॉसिंगवरून रेल्वेला ओलांडताना रस्ता वापर करणा-यांनी सावधानता बाळगली पाहिजे. दक्ष राहिले पाहिजे. मनुष्य रहीत लेव्हल क्रॉसिंग हेच अशा वाहनांच्या अपघातासाठी धोकादायक क्षेत्र आहे.
यासाठी रस्त्यावरील वाहनाने तेथे येताच थांबले पाहिजे. त्या ठिकाणी चालकाने तेथे उतरून रेल्वे दोन्ही बाजूने येत नाही ना, याची खात्री करून मगच पुढे रेल्वेचे क्रॉसिंग करायला हवे. आपल्या येथे रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगवर गेट बंद असतानाही मोटारसायकली घातल्या जातात.भारतामत ३० हजारपेक्षा अधिक लेव्हल क्रॉसिंग असून ११००० लेव्हल क्रॉसिंग मनुष्यविरहीत आहेत. अशा ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. तरीही ते होतात. अर्थात आता त्यावरही आणखी एक पर्याय इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन - इस्रोद्वारे विकसित केला जाणार आहे. उपग्रहाधारित ही प्रणाली असून ती रस्ता वापरणा-यांना रेल्वे त्या क्रॉसिंगजवळ येत असताना सावध करील. त्यासाठी भोंगा वाजला जाईल.
इस्रोने विकसित केलेल्या इंटिग्रेटेड चिप्स सध्या १० हजार लोकोमोटिव्ह रेल्वेगाड्यांमध्ये बसवण्यात येत आहेत लेव्हल क्रॉसिंगपासून ५०० मीटर अंतरावर रेल्वे येताच या चिप्सद्वारे क्रॉसिंगला असलेला भोगा आपोआप सक्रीय होत वाजू लागेल, तसेच रस्त्यावरून जाणा-यांना ती माहिती मिळेल व रेल्वे क्रॉसिंग जवळ आहे, याची सूचनाही रेल्वेड्रायव्हरला मिळेल. सध्या दिल्ली - राजधानी गुवाहाटी मार्गावर सोनेपूर विभागातील दोन लेव्हल क्रॉसिंगवर अशी प्रणाली सुरू केली गेली आहे. दिल्ली-मुंबई रेल्वे मार्गावरही काही क्रॉसिंगवर अशी प्रणाली लवकर सुरू होणार आहे. सर्व क्रॉसिंगवर लवकरच अशी प्रमाली बसवण्यात येणार आहे. हे होणार्सले तरी मुळात अपघातांना कारण असणा-या वाहनांच्या चालकांनीही मुळात उतावळेपण टाळून मनुष्यविरहीत लेव्हल क्रॉसिंगवर सावध राहाण्याची गरज आहे. अन्यथा भोंगा वाजला तरी ऐकलाच गेला नाही, तर मात्र अपघाताचा भोंगाही पुन्हा वाजत राहीलच!