नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२४ मध्ये किरकोळ वाहन विक्री क्षेत्राने ‘टॉप गिअर’ टाकल्याचे दिसून आले आहे. या महिन्यात किरकोळ वाहन विक्री वार्षिक आधारावर १३ टक्के वाढली. वाहन वितरकांची शिखर संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) ही माहिती गुरुवारी दिली.
‘फाडा’ने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये २०,२९,५४१ वाहनांची किरकोळ विक्री झाली. फेब्रुवारी २०२३ मध्ये १७,९४,८६६ वाहने विकली गेली होती. प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री १२ टक्के वाढून ३,३०,१०७ वाहनांवर गेली. आदल्या वर्षी हा आकडा २,९३,८०३ इतका होता.
‘फाडा’चे अध्यक्ष मनीष सिंघानिया यांनी सांगितले की, चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी वाहन विक्री नाेंदली गेली आहे. बाजारात नव्या मॉडेलांचे सादरीकरण आणि वाहन उपलब्धतेतील वाढ यामुळे वाहन विक्रीला बळ या हंगामात मिळाले आहे.
विक्री कशामुळे वाढली?सिंघानिया यांनी सांगितले की, दुचाकी वाहनांच्या विक्रीत झालेल्या वाढीमागे ग्रामीण भागातील मागणीत झालेली वाढ, प्रीमियम मॉडेलचे लोकांतील वाढते आकर्षण, व्यापक वाहन उपलब्धता आणि उत्पादकांकडून मिळालेल्या जबरदस्त सवलती ही प्रमुख कारणे आहेत. लग्नसराईचा हंगाम आणि अधिक चांगली आर्थिक स्थिती यांचाही विक्रीवर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले.
- बाजारात आलेली नवी मॉडेल्स आणि मार्केटिंगमुळे बाहनांचा खप वाढला आहे.
प्रतिकूल स्थितीवर मात - फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक वाहनांची किरकोळ विक्री ५ टक्के वाढून ८८,३६७ झाली. - सिंघानिया यांनी सांगितले की, रोखीची कमतरता आणि खरेदीवर आलेली स्थगिती यांसारख्या प्रतिकूल कारणांवर मात करून व्यावसायिक वाहनांची विक्री वाढली आहे. - या क्षेत्रातील लवचीकपणा यातून दिसून येतो.