मुंबई: टाटा यंदाच्या वर्षात अनेक नव्या कार बाजारात आणणार आहे. याची सुरुवात टाटानं अल्ट्रोज (Tata Altroz) या प्रीमियम हॅचबॅकनं केली आहे. ऑटो एक्स्पोच्या आधीच टाटानं अल्ट्रोझ लॉन्च केली असून तिच्या प्री बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. अवघ्या २१ हजारांमध्ये ही कार बुक करता येणार आहे. टाटा अल्ट्रॉझ बाजारात थेट मारुती सुझुकी बलेनो आणि ह्युंदाई इलाईट आय २० शी स्पर्धा करेल. त्यामुळेच या कार्समध्ये नसलेली अनेक फिचर्स अल्ट्रॉझमध्ये देण्यात आली आहेत. याशिवाय किंमतदेखील कमी ठेवण्यात आली आहे. या कारची किंमत ५.२९ लाखांपासून सुरू होते. या कारच्या टॉप व्हर्जनची किंमत ९.२९ लाख इतकी आहे.टाटाची अल्ट्रोझ XZ(O), XZ, XT, XM आणि XE अशा पाच व्हेरिंएटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनमध्ये पाचही व्हेरिंएट उपलब्ध आहेत. डाऊनटाऊन रेड, हाय स्ट्रीट गोल्ड, स्कायलाईन सिल्वर, ऍव्हेन्यू व्हाईट आणि मिडटाऊन ग्रे अशा पाच रंगांमध्ये अल्ट्रोझ लॉन्च करण्यात आली आहे. टाटा मोटर्सनं अल्फा (Agile Light Flexible Advanced) प्लॅटफॉर्मवर या कारची निर्मिती केली आहे. अल्ट्रोझच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये ८६ एचपीचं १.२ लीटरचं इंजिन देण्यात आलं आहे. तर डिझेल व्हर्जनमध्ये ९० एचपीचं १.५ लीटरचं इंजिन दिलं गेलं आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही इंजिन BS6 स्टँडर्डची आहेत. अल्ट्रोझमध्ये टाटानं सुरक्षेला अतिशय प्राधान्य दिलं आहे. या कारला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅमनं फाईव्ह स्टार रेटिंग दिलं आहे. अशा प्रकारचं रेटिंग मिळणारी अल्ट्रोझ देशातली दुसरी कार आहे. याआधी टाटाच्याच नेक्सन (Tata Nexon) कारला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालं आहे. टाटा अल्ट्रोझमध्ये ड्युएल फ्रंट एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमांयडर, ईबीडीसह एबीएस, स्पीड अलर्ट सिस्टम, चाईल्ड सीट अँकरेज आणि कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अल्ट्रोझच्या सर्व व्हेरिंएटमध्ये या सुविधा उपलब्ध असतील. टाटाच्या इतर गाड्यांप्रमाणेच अल्ट्रोझ हॅचबॅकमध्ये ड्राईव्ह मोड सुविधा देण्यात आली आहे. टाटाच्या नेक्सन आणि हॅरियरमध्येदेखील ड्राईव्ह मोड देण्यात आलं आहे. अल्ट्रोझमध्ये सिटी आणि इको असे दोन ड्राईव्ह मोड आहेत. सिटी मोडमध्ये इंजिन पूर्ण क्षमतेनं वापरलं जातं. तर इको मोडमध्ये कार जास्त मायलेज देते. अल्ट्रॉझमध्ये अल्बाट्रॉस दरवाजे दरवाजे देण्यात आले आहेत. हे दरवाजे ९० अंशांपर्यंत उघडतात. प्रीमियम हॅचबॅक प्रकारातल्या इतर कोणत्याही कारमध्ये ही सुविधा देण्यात आलेली नाही. लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी हे दरवाजे फायदेशीर ठरतात. या दरवाजांमुळे कारमध्ये जाऊन बसणं आणि आतून बाहेर पडणं जास्त सहजसोपं होतं. वेअरबेल की (हातात घालता येईल अशी चावी) हे अल्ट्रोझचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. अल्ट्रोझच्या प्रतिस्पर्धी कार्समध्ये ही सुविधा नाही. अल्ट्रोझच्या टॉप व्हर्जनसोबत वेअरबेल की मिळेल. मात्र सुरुवातीच्या व्हर्जनमध्ये ही सुविधा पर्यायी असेल. वेअरबेल की असल्यावर साधी चावी बाळगायची गरज भासत नाही.
अल्ट्रोझसोबतच टाटानं टिगोर, टिऍगो, नेक्सन या कारची बीएस ६ व्हर्जन्सदेखील लॉन्च केली. एकाचवेळी चार कार्सची बीएस ६ व्हर्जन लॉन्च करणारी टाटा ही पहिली कंपनी ठरली आहे.