भारतीय बाजारपेठेत अधिक इलेक्ट्रीक वाहनं आणण्यासाठी टाटा मोटर्सनं कंबर कसली असून त्या दृष्टीनं कंपनी तीव्र गतीनं पुढे जात आहे. सध्या कंपनीकडे नेक्सॉन, टिगोर इलेक्ट्रीक अशा कार्स उपलब्ध आहे. आता कंपनी आपली बेस्ट सेलिंग मिनी एसयुव्ही टाटा पंचचं इलेक्ट्रीक व्हेरिअंट सादर करण्याच्या तयारीत आहे. नुकतीच ही इलेक्ट्रीक कार टेस्टिंगदरम्यान स्पॉट करण्यात आली. ही कार याच वर्षी भारतीय बाजारपेठेत लाँच केली जाऊ शकते.
बॉक्सी लूक आणि डिझाईनमुळे टाटा पंचचं सध्याचं आयसीई इंजिन मॉडेल अतिशय प्रसिद्ध आहे. दरम्यान, केवळ फ्रन्ट ग्रिल सोडलं तर इलेक्ट्रीक व्हर्जनचा लूक आणि डिझाईनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असं म्हटलं जातंय. जसं इलेक्ट्रीक वाहनांमध्ये दिसून येतं त्याप्रमाणे यात एअर इंटेकची गरज नसते. कंपनी या कारमध्ये नवी फीचर्स ॲड करू शकते.
पॉवर आणि बॅटरी
टाटा पंच ईव्हीच्या पॉवरट्रेन अथवा बॅटरी पॅकबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु यात टाटा मोटर्स झिपट्रॉन तंत्रज्ञानाच्या पॉवरट्रेनचा वापर करण्याची शक्यता आहे. यामध्ये एक लिक्विड कुल्ड बॅटरी आणि एक मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर दिली जाते. हे इलेक्ट्रीक मोटर कारच्या पुढील चाकांना पॉवर देते. दरम्यान, पंच आणि टिगोरमध्ये निरनिराळ्या बॅटरी साईज दिल्या जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार यामध्ये कंपनी 25kWh क्षमतेची बॅटरी देऊ शकते. ही सिंगल चार्जमध्ये 250 ते 300 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यात सक्षम असेल.
या कारचं उत्पादन जून महिन्यात सुरू होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यात ही कार लाँच होऊ शकते. या कारच्या किंमती बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तरी याची किंमत 9 लाखांपर्यंत असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.