देशांतील दिग्गज ऑटो कंपनी टाटा मोटर्सच्या (TATA Motors) गाड्यांची जागतिक स्तरावर विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीनं गाड्यांच्या उत्तम विक्रीची नोंद केली. दरम्यान, चिप्सची कमतरता असूनही, कंपनीच्या Jaguar Land Rover सह इतर वाहनांची विक्री देखील या काळात चांगली झाली आहे.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत टाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. कार आणि कमर्शिअल गाड्यांमध्ये झालेल्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या दरम्यान कंपनीनं 2,51,689 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच तिमाहित कंपनीच्या 2,02,873 युनिट्सची विक्री झाली होती.
पॅसेंजर व्हेईकल्सच्या विक्रीत 10 टक्के वाढजुलै ते सप्टेंबर या कालावधीत पॅसेंजर व्हेईकलच्या 1,62,634 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ही 10 टक्के अधिक आहे. तर एप्रिल ते जून या कालावधीत टाटा मोटर्सच्यी एकूण विक्री ही 2,14,250 युनिट्स होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 17 टक्के अधिक आहे.
TATA Motors ची लक्झरी कार युनिट Jaguar Land Rover च्या विक्रीतही वाढ झाल्याचं दिसून आलं. कंपनीनं या कालावधीत 78,251 Jaguar Land Rover कार्सची विक्री केली. यामध्ये Jaguar ची विक्री 13,944 युनिट्स आणि Land Rover ची विक्री 64,307 युनिट्स होती. जागतिक बाजारपेठेत चिप्सची कमतरता असतानाही TATA Motors नं उत्तम कामगिरी केली आहे.