'देश का ट्रक' ही टॅगलाईन सार्थ ठरवणारी, कमर्शियल व्हेईकल उत्पादनातील सर्वात मोठी भारतीय कंपनी 'टाटा मोटर्स'नं आज सीएनजीवर चालणारा देशातील पहिला ट्रक लाँच केला आहे. 'अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम'ने (ADAS) हा ट्रक सुसज्ज आहे. म्हणजेच, ट्रकसमोर येणारा अडथळा ओळखणं, ड्रायव्हरला त्याबाबत सावध करणं, प्रसंगी ऑटोमॅटिक ब्रेक लागणं, टायर प्रेशरबाबत अपडेट्स देणं अशा अद्ययावत सुविधा या सीएनजी ट्रकमध्ये आहेत. त्याशिवाय, आपल्या प्रायमा, सिग्ना आणि अल्ट्रा ट्रकची रेंज टाटा मोटर्सनं नव्या फीचर्ससह लाँच केली आहे. महिंद्रा एक्सयुव्ही ७०० या एसयूव्हीमध्ये ADAS यंत्रणा आहे. ती आपल्या ट्रकमध्ये आणून 'टाटा'ने मोठीच झेप घेतलीय.
सीएनजीवर चालणारी छोटी व्यावसायिक वाहनं, हलकी व्यावसायिक वाहनं आणि सीएनजी बसेसचा 'टाटा'चा प्रयोग यशस्वी ठरला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा वळवला 'मीडियम आणि हेवी कमर्शियल व्हेईकल' श्रेणीकडे. सीएनजीवर चालणारा ट्रक बनवण्याचं आव्हान त्यांनी समर्थपणे पेललं आहे. २८ टन आणि १९ टनचे सीएनजी ट्रक ते बाजारात घेऊन आलेत. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आरामदायी सुविधांनी परिपूर्ण नवीन सिग्ना सीएनजी मॉडेलही बाजारात दाखल होणार आहे.
सात नव्या दणदणीत ट्रक, टिपरच्या दिमाखदार लाँचिंगनंतर, टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिटचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील महागाईचं संकट, पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये होणारी वाढ आणि परिणामी सामान्यांच्या खिशावर पडणारा भार, या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधनाचा विचार करणं ही काळाची गरज बनली आहे. त्यातही, व्यावसायिक वाहनांमध्ये पर्यायी इंधनाचा वापर केल्यास, पैशाची बचत आणि पर्यावरण रक्षण ही दोन्ही उद्दिष्टं साध्य होऊ शकतात. म्हणूनच, 'सीएनजी ट्रक' हे महत्त्वाकांक्षी पाऊल टाटा मोटर्सनं उचललं आहे, असं त्यांनी नमूद केलं. पर्यायी इंधन, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा या तीन मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन नव्या ट्रक्सची रचना करण्यात आल्याचंही ते म्हणाले.
सीएनजी ट्रकची किंमत अर्थातच डिझेल ट्रकपेक्षा जास्त असेल, पण खरेदीनंतर वाचणारा खर्च पाहता, साधारण १५ महिन्यांमध्ये ती रक्कम कव्हर होईल, असंही त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलं.
ट्रक चालकासाठी प्रशस्त केबिन, त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक तंत्रज्ञान, अत्याधुनिक फीचर्स यामुळे चालक अधिक काम करू शकेल, स्वाभाविकच जास्त अंतर कापलं जाईल आणि खर्च कमी होईल, असं गणितही गिरीश वाघ यांनी मांडलं.