नवी दिल्ली : नवीन कार लाँच करूनही टाटा मोटर्सला 2019 चे वर्ष संघर्षाचे गेले आहे. याच वर्षी एमजी हेक्टर आणि किया सेल्टॉस या दोन नव्या कंपन्य़ांच्या कार लाँच झाल्याने याचा फटका टाटाला बसला. तसेच अन्य कंपन्यांनाही याचा फटका बसला. टाटाचे व्यवस्थापकीय संचालक गुंटेर बटश्चेक यांनी सांगितले की, येणाऱ्या आर्थिक वर्षाकडून कंपनीला मोठ्या आशा आहेत. या वर्षात वाहनांची विक्री वाढेल. कंपनीकडे 12 मॉडेल्स आहेत जी भविष्यात बाजारात आणली जाणार आहेत.
टाटा हॅरिअर ही कंपनीची लोकप्रिय झालेली कार आहे. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये या कारने चांगली विक्री नोंदविली होती. मात्र, दणकट कार असूनही दोन नवीन कंपन्यांमुळे हॅरिअरला पिछाडीवर जावे लागले होते. टाटाने यापासून धडा घेत बीएस 6 युक्त कारमध्ये नवीन फिचर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एएमटी आणि सनरुफही असणार आहे.
याशिवाय कंपनी हॅचबॅकमध्ये टाटा अल्ट्रॉज, SUV Tata Gravitas आणि टाटा नेक्सॉनचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. तसेच टियागो आणि टिगॉरचे BS6 व्हेरिअंटही कंपनी लाँच करणार आहे. टाटा ग्रॅवीटास ही कंपनीची 7 सीटर एसयुव्ही आहे. ही कार ऑटो एक्स्पोला लाँच केली जाणार आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड अॅटोमॅटीक गिअरबॉक्स ऑप्शन मिळणार आहे. हॅरिअरमध्येही अॅटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात येणार आहे.
कशी आहे टाटा हॅरिअर? वाचा 1500 किमींचा लाँग टर्म रिव्ह्यू
टाटाची ही कार OMEGARC य़ा नव्या प्लॅटफॉर्मवर लाँच केली आहे. ही एसयुव्ही चार व्हेरिअंटमध्ये येणार आहे. 2.0-लीटर क्रायोटेक डीझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 3750 rpm वर 140 पीएसची ताकद देते.