टाटा मोटर्सने इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात भक्कम पाऊल रोवण्याकडे पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. यासाठी फोर्ड इंडियाचा सानंद येथील बंद पडलेला वाहन निर्मिती प्रकल्प विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये कंपनी सुमारे २००० कोटी रुपये गुंतविणार असून २०२६ पर्यंत कंपनी या प्रकल्पातून दोन लाख ईव्ही बनविणार आहे.
टाटाच्या इलेक्ट्रीक गाड्यांना आता मागणी वाढू लागली आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांच्या उत्पादनासह टाटा त्याच्या ताफ्यातील सर्वच कारची इलेक्ट्रीक मॉडेल आणण्याच्या विचारात आहे. अशावेळी टाटाला मनुष्यबळ आणि प्रकल्पाची गरज भासणार आहे. अशातच फोर्डचा तयार प्रकल्प हाती आल्यास टाटाचे निम्मे काम होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा मोटर्सने गुजरात सरकारला आश्वासन दिले आहे.
फोर्ड इंडियाच्या सानंद येथील प्रकल्पातील कोणत्याही कर्मचाऱ्याला काढून टाकले जाणार नाही. तसेच जमीन हस्तांतरण शुल्कात सूट द्यावी, यासाठी आम्ही २० टक्के कर भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. याचसोबत कंपनीने फोर्डला जो २०३० पर्यंत इन्सेंटिव्ह देण्यात येत होता, तो देखील देण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यवहाराशी संबंधीत सूत्राने म्हटले आहे की, सरकारने टाटा मोटर्सच्या या मागण्या मान्य केल्या आहेत.
टाटा मोटर्स सध्याच्या घडीला ईव्ही कार या नॅनोच्या प्रकल्पात बनवित आहे. टाटा नॅनो फेल गेल्याने त्या प्लांटचा वापर इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी करण्यात येत आहे. परंतू आता मागणी वाढू लागली आहे. यामुळे टाटाला वर्षाला आणखी दोन लाख ईव्ही बनवाव्या लागणार आहेत. यामुळे 23,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
फोर्डच्या प्रकल्पाची क्षमता कीती...फोर्ड मोटर कंपनीने वर्षाला सुमारे 2.4 लाख कार आणि 2.7 लाख इंजिन तयार करण्याची क्षमता असलेला प्लांट उभारला होता. यासाठी 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतू, गेल्याच वर्षी फोर्डने भारतातून एक्झिट घेतली. फोर्डने गेल्या दशकभरात कंपनीला दोन अब्ज डॉलर्सचा तोटा झाल्याचे म्हटले होते. परंतू आधीच्या ग्राहकांना सेवा देत राहणार असल्याचे म्हटले होते.