Tata Motors: टाटा मोटर्स देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, टाटानेही आपल्या अनेक गाड्यांचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहेत. Tata Nexon EV ही टाटाची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. पण, सध्या याबाबत एक अशी तक्रार समोर आली आहे, ज्यामुळे टाटा इलेक्ट्रिक कारच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
काय आहे संपूर्ण प्रकरण:मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील एका व्यक्तीने सोशल नेटवर्किंग साइट 'X' (ट्विटर) वर त्याला आलेला Nexon EV चा अनुभव शेअर केला आहे. नेक्सॉन ईव्हीच्या डिलिव्हरीनंतर अवघ्या 10-12 तासात कार बंद पडल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, अहमदाबादचे रहिवासी जितेंद्र एच. चोप्रा यांनी अलीकडेच नवीन Tata Nexon EV घेतली. जितेंद्र यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "आम्ही 14 जुलै 2023 रोजी दुपारी 1.30 वाजता टाटा डीलर प्रोग्रेसिव्ह कार्स, अहमदाबाद कडून टाटा नेक्सॉन ईव्हीची डिलिव्हरी घेतली. दहा तासांनंतर आणि फक्त 15-20 किमी चालल्यानंतर नवीन कार रात्री 11 च्या सुमारास अचानक बंद पडली. यानंतर आम्ही कार डीलरकडे परत केली."
"डीलरने आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितले की, यातील PSA नावाचा मुख्य भाग आम्ही बदलला आहे. पण, अवघ्या 10 तासांनंतर बिघाडणारी गाडी मला नको होती, म्हणून मी त्यांना नवीन वाहन देण्याची किंवा पैसे परत करण्याची विनंती केली. मानसिकदृष्ट्या मी हे बिघडलेली गाडी चालविण्यास तयार नाही. डीलर आणि टाटा मोटर्सचे अधिकारी मला दोनदा भेटले आणि त्यांनी मला या वाहनाच्या डिलिव्हरीसोबत इतर काही फायदे देऊ केले, पण मी त्यांना नकार दिला.
"आता अनेक दिवस होऊनही त्यांनी माझा समस्या सोडवली नाही. माझी कारही त्यांच्याकडेच आहे. त्यांनी मला फक्त एक मेल पाठवून गाडी घेऊन जाण्यास सांगितले आहे. पण, मला बिघडलेली गाडी नकोय. टाटाने मला मीडिया आणि सोशल मीडियावर ही माहिती शेअर करण्यास भाग पाडले. हे वाचून टाटातील लोक मला मदत करतील अशी आशा आहे, " अशी माहिती जितेंद्र यांनी दिली. या ट्विटमध्ये त्यांनी टाटा मोटर्सला टॅगही केले आहे. पण, अद्याप टाटा मोटर्सकडून याप्रकरणी कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.
ही पहिलीच घटना नाहीTata Nexon EV मध्ये तांत्रिक बिघाड होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी असाच काहीसा प्रकार मुंबईत राहणार्या कार्मेलिता फर्नांडिस यांच्यासोबत घडला आहे. त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात Nexon EV प्राइमची बुकिंग केली होती. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात कारची डिलिव्हरी मिळाली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, पण अचानक त्यांच्या कारची बॅटरी डाऊन झाली आणि गाडी बंद पडली. त्यांनीही सोशल मीडियावर या प्रकरणाची तक्रार केली होती. घ्या."