नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार आधीच महाग आहेत. दरम्यान, आता देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) आणखी महाग झाली आहे.
टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या Tata Nexon EV कारची किंमत 25000 रुपयांनी वाढवली आहे. ही दरवाढ सर्व व्हेरिएंट्सच्या किमतींवर लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या Tata Nexon EV पाच व्हेरिएंट्समध्ये येते. यात XM, XZ Plus, XZ Plus Luxury, Dark XZ Plus आणि Dark XZ Plus Luxury व्हेरिएंट आहेत. या सर्वच व्हेरिएंट्सच्या किंमती वाढल्या आहेत.
Tata Nexon EV ची सुरुवातीला किंमत 14.29 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू झाली होती, जी आता 14.54 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ही कारच्या बेस व्हेरिएंट XM ची किंमत आहे. तसेच, Tata Nexon EV च्या Dark XZ Plus Luxury व्हेरिएंटची किंमत 17.15 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे, जी आधी 16.90 लाख रुपये होती. दरम्यान, जवळपास दोन वर्षांपूर्वी लॉन्च झाल्यापासून कंपनीने Tata Nexon EV च्या 13,500 हून अधिक युनिट्स विकल्या आहेत.
Tata Nexon EV चे स्पेसिफिकेशन्सTata Nexon EV ला पर्मनेंट मॅन्गेट एसी मोटर मिळते, जी 245 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात IP67 प्रमाणित 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे, जी फास्ट चार्जरने 1 तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. ही कार 9.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. कारची रेंज 300 किमीच्या जवळपास आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा आपल्या Nexon EV ची रेंज वाढवण्याचे काम करत आहे. यासाठी अपडेटेड नेक्सॉनमध्ये मोठा बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, कारमध्ये 40kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याची ड्रायव्हिंग रेंज 400 च्या पुढे जाऊ शकते.