भारताची पहिली फाईव्ह स्टार सुरक्षा देणारी कार नेक्सॉन आता नव्या पर्यायामध्ये भारतात येणार आहे. ही डिझेल किंवा पेट्रोलवर चालणारी कार नसून वीजेवर चालणार आहे. यासाठी टाटाने झिपट्रॉन हे तंत्रज्ञान वापरले आहे.
टाटाची ही दणकट कार चौथ्या तिमाहीमध्ये भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. टाटाची टिगॉर सध्या इलेकट्रीकमध्ये उपलब्ध आहे. मात्र, ही कार केवळ सरकारी कार्यालयांमध्ये वापरली जात आहे. ही कार एकदा चार्ज केली की 100 किमी अंतर पार करते. मात्र, नेक्सॉनची रेंज खूप मोठी आहे.
निस्सानची लीफ भारतात लाँच होणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना या कारची स्पर्धा करणे कठीण जाणार आहे. कारण लीफची रेंज 350 किमीच्या आसपास आहे. मात्र या कारची किंमतही खूप म्हणजेच जवळपास 30 लाखांच्या आसपास असणार आहे. यामुळे टाटाची नेक्सॉन उजवी ठरण्याची शक्यता आहे.
Nexon EV ची रेंज 300 किमींची आहे. यामुळे ही कार सध्याच्या भारतीय बाजारातील सर्वात लांबचा टप्पा गाठणारी ईव्ही कार ठरणार आहे. टाटा मोटर्सने मिलिंद सोमण व अंकिता कोनवार या पॉवर कपलसोबत एक मोहिम आखली आहे. यामध्ये हे दोघे मनाली ते लेह प्रवास करणार आहेत. नेक्सॉनची किंमत 15 ते 17 लाखांच्या आसपास असेल.