मुंबई : टाटा मोटर्सने साधारण वर्षभरापूर्वी पहिली इलेक्ट्रीक कार लाँच केली होती. मात्र, ही कार केवळ सरकारी कार्यालये, मंत्रालयासाठीच वापरण्यात येत होती. तसेच या कारची रेंजही कमी होती. मात्र, आता सामान्यांसाठीही कंपनीने टिगॉर ही कॉम्पॅक्ट सेदान कार बाजारात आणली आहे.
टिगॉर ही कंपनीची पहिली इलेक्ट्रीक कार आहे. ही कार एका चार्जिंगमध्ये 110 किमी चालू शकत होती. सध्या देशात बदलाचे वारे आहेत. यामुळे ऑटो मोबाईल कंपन्यांना पुढील काही वर्षांत पेट्रोल, डिझेवरील कारना टाटा करावा लागणार आहे. मात्र, इलेक्ट्रीक वाहनांसाठीचे तंत्रज्ञानही सध्या अप्रगत आहे. महिंद्राचीही इलेक्ट्रीक कार आहे. मात्र, तिची रेंजही 100 च्या आसपासच आहे. तसेच किंमतही जास्त असल्याने या वाहनांकडे जाण्याचा कल कमीच आहे.
टाटाने नव्या टिगॉरमध्ये बदल करत तिची रेंज दुपटीने वाढविली आहे. 110 किमीवरून ही रेंज 213 किमींवर नेली आहे. ही कार तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे. एक्सईप्लस, एक्सएमप्लस आणि एक्सटीप्लस असे तीन व्हेरिअंट आहेत. जवळपास 30 शहरांमध्ये कार उपलब्ध होणार असून एक्स शोरूम किंमत 9.44 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे सरकारी कार्यालये सोडून कंपन्या, संस्था किंवा खासगी व्यक्तीही ही कार खरेदी करू शकणार आहेत.
टाटाची लवकरच नेक्सॉन ईव्ही बाजारात येणार आहे. Nexon EV ची रेंज 300 किमींची आहे. यामुळे ही कार सध्याच्या भारतीय बाजारातील सर्वात लांबचा टप्पा गाठणारी ईव्ही कार ठरणार आहे. टाटा मोटर्सने मिलिंद सोमण व अंकिता कोनवार या पॉवर कपलसोबत एक मोहिम आखली आहे. यामध्ये हे दोघे मनाली ते लेह प्रवास करणार आहेत. नेक्सॉनची किंमत 15 ते 17 लाखांच्या आसपास असेल.