टाटाची ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक खप असलेली कार टाटा पंचबाबत धक्कादायक बातमी येत आहे. या छोट्या एसयुव्हीला मुंबईहून गुजरातला जात असताना आग लागल्याची घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने कारमधील सर्वांना बाहेर काढण्यात आले, परंतू कार काही वाचविता आली नाही. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे ही कार नवी कोरी होती.
गुजरातच्या नवसारी येथील ही घटना आहे. अलीपूर गावाजवळ ही कार आली असता कार मालक असलेल्या प्रबल यांना कारच्या डाव्या बाजुच्या हेडलाईटमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. महिनाभरपूर्वीच ही कार घेतली होती. पहिली सर्व्हिसिंगही झाली नव्हती. टाटा पंचचा AMT Accomplished व्हेरिअंट त्यांनी खरेदी केला होता. ही कार जळून खाक झाली आहे.
टाटाची ही फाईव्ह स्टार रेंटिगवाली कार आहे. १ एप्रिलला प्रबल हे त्यांच्या कुटुंबासोबत गुजरातला जात होते. हेडलाईटमधून धूर येत असल्य़ाचे पाहून ते घाबरले. गाडी लगेचच रत्याच्या बाजुला थांबविली आणि बाहेर येऊन पाहिले तर हेडलँपला आगीने वेढले होते. यामुळे त्यांनी आत बसलेल्या कुटुंबीयांना गाडीबाहेर काढले. तिथल्या लोकांनी तातडीने फायर ब्रिगेडला याची माहिती दिली. फायर ब्रिगेडने आग विझविली, परंतू तोपर्यंत आगीने कार खाक झाली होती. कंपनीने यावर अद्याप काही खुलासा केलेला नाहीय.
प्रबल यांनी या घटनेची माहिती डीलरला दिली आहे. तसेच टाटा मोटर्सची टीम या घटनेची चौकशी करत आहे. कारला आग लागण्याचे कारण समोर आलेले नाहीय. या घटनेचा एफएससी रिपोर्ट समोर आल्यावरच माहिती मिळू शकेल.
कंपनीनं दिलं स्पष्टीकरण..."आम्ही या थर्मल घटनेचा शोध घेत आहोत. ग्राहकाला झालेला त्रास आम्ही समजू शकतो. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आम्ही ग्राहक आणि तपास यंत्रणांशी सर्व शक्य सहाय्य देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या दुर्दैवी घटनेमागचं कारणं शोधण्यासाठी तपशीलवार तपास करणार आहोत. टाटा मोटर्समध्ये वाहन आणि त्यांच्या वापरकर्त्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असं टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.