जगातील सर्वात मोठे अब्जाधीश एलन मस्क हे वादग्रस्त व्यक्तीमत्व बनले आहेत. यामुळे अमेरिकेसह अन्य देशांत त्यांच्या टेस्ला कंपनीच्या कार लोकांच्या रागाच्या बळी पडू लागल्या आहेत. मस्क यांची कारकीर्दच वादग्रस्त असताना आता भारतात टेस्लाने एन्ट्रीपूर्वीच नवा वाद सुरु केला आहे. गुरुग्राममध्ये असलेल्या टेस्ला पॉवर या भारतीय कंपनीविरोधात टेस्ला आता नावावरून कोर्टात गेली आहे.
मस्क यांची कंपनी टेस्ला इंक आणि गुरुग्राममधील बॅटरी निर्माता कंपनी टेस्ला पावर यांच्यात ट्रेडमार्कवरून वाद सुरु झाला आहे. कोर्टाने त्यांना मध्यस्थीने वाद सोडविण्याचा सल्ला दिला होता, परंतू या दोघांतील ही चर्चा निष्फळ ठरल्याने आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे. न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी बुधवारी या वादावर १५ एप्रिलला सुनावणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी या दोन कंपन्यांमध्ये नावावरून वाद सुरु झाला. ट्रेडमार्कच्या कथित उल्लंघनावर वाद आपापसात सोडविण्यास न्यायालयाने सांगितले होते. या दोघांमध्ये चर्चा झाली परंतू त्यातून काही निष्पन्न झाले नाही. यामुळे आता दोन्ही पक्ष १५ एप्रिलला कोर्टात हजर राहणार आहेत.
टेस्ला पावर ग्राहकांना फसवत आहे आणि भ्रम निर्माण करत आहे. यामुळे आमच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचत असल्याचा आरोप मस्क यांच्या टेस्लाने केला आहे. टेस्ला पावरच्या नावावर कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटर विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. टेस्ला पावरने यावर आपण ६९९ ईलेक्ट्रीक स्कूटर विकल्याचे म्हटले आहे. परंतू आमचा प्रमुख व्यवसाय हा ऑटोमोबाईल आणि इन्व्हर्टरसाठी लीड एसिड बॅटरी बनविणे हा आहे. आम्ही इलेक्ट्रीक वाहने बनवत नाही तर एका कंपनीसोबत टायअप करून ई-अश्व नावाच्या ईलेक्ट्रीक स्कूटर बनविण्यात आल्या आहेत. आमचा ईलेक्ट्रीक वाहने बनविण्याची मुळीच योजना नाहीय, असे स्पष्ट केले आहे.
टेस्ला पावर काय म्हणतेय...
टेस्ला हा कोणताही युनिक ट्रेडमार्क नाही. भारतासह अन्य देशांतही टेस्ला नावाने कंपन्या रजिस्टर आहेत. यामुळे मस्क यांच्याकडून आम्हीच टेस्ला वर दावा करण्यास हक्कपात्र आहोत, आमचाच एकाधिकार आहे असे सांगणे योग्य नाहीय, असे टेस्ला पावरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साई दीपक यांचे म्हणणे आहे.