जोवर टेस्ला भारतात कंपनी उभी करत नाही, तोवर टेस्लाला इलेक्ट्रीक कार विकण्यास परवानगी देणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मस्क यांना फटकारले होते. चीनमधून आयात केलेल्या कार आम्ही भारतात विकू देणार नाही, असे गडकरी म्हणाले होते. यावर एलन मस्क यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
एका युजरने एलन मस्क यांना टेस्ला भारतात प्लांट कधी उभा करणार आहे, असा सवाल केला होता. यावर मस्क यांनी उत्तर दिले आहे. गडकरींच्या कठोर भूमिकेला त्यांचे हे उत्तर आहे.
टेस्ला अशा कोणत्याही ठिकाणी कार निर्मिती प्रकल्प सुरु करणार नाही, जिथे आधी टेस्लाच्या कार विकण्याची आणि सेवा देण्याची परवानगी नाही, असे मस्क यांनी ट्विटमधील उत्तरात म्हटले आहे. म्हणजेच टेस्लाला भारतात जोवर विक्री आणि सेवा देण्याची परवानगी केंद्र सरकार देत नाही, तोवर कंपनी कार उत्पादन प्रकल्प भारतात उभारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने टेस्लाला भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. गेल्या वर्षी टेस्लाचे अधिकारी टेस्लाची इलेक्ट्रीक कार घेऊन दिल्लीला गेले होते. तिथे गडकरीच्या मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांना सैरसपाटाही करवण्यात आला. मात्र, मस्क यांना चीनमधून ही कार भारतात विकायची होती. यासाठी त्यांनी भारताने आयात कर कमी करावा, करांमध्ये दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. यावर गडकरींनी भारतात प्रकल्प उभा करा, मग विचार करू अशी भूमिका घेत मस्क यांची मागणी फेटाळली होती. तसेच अनेकदा त्यांनी याबाबत वक्तव्ये केली होती.