जगातील सर्वात श्रीमंतांच्या पंक्तीत असलेले टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांना अंतराळात मोठी रुची असली तरी देखील त्यांच्याच कंपनीच्या एका कारने हसू केले आहे. टेस्लाच्या (Tesla) कार खूप चर्चेत असतात. टेस्लाच्या एका लाँचिंग कार्यक्रमात मस्क यांनी बुलेटप्रूफ कारचे प्रात्यक्षिक दाखविताना काच फुटली होती. आता असाच काहीसा प्रकार घडला आहे. (Tesla car confused on moon, understand as yellow signal and keep braking.)
टेस्लाच्या कारमध्ये एक खास ऑटो पायलट मोड देण्यात आला आहे. यामुळे कार चालविण्याची कटकटच संपून जाते. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने टेस्लाची कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरेतर टेस्ला कारमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग (self-driving telsa car) फीचर आहे. यामुळे गाडी आपोआप पुढे चालत राहते. परंतू टेस्लाची कार चंद्राला ओळखू न शकल्याने त्यातील सर्वात मोठी त्रूटीवरून लोकांनी या कारची चर्चा सुरु केली आहे. हा व्हिडीओ जॉर्डन नेल्सन नावाच्या व्यक्तीने बनविला आहे.
जॉर्डन नेल्सन हे अमेरिकेत राहतात. त्यांनी आपली टेस्ला कार सेल्फ ड्रायव्हिंग मोडवर टाकली होती. अचानक कार सारखी सारखी ब्रेक मारायला लागली. समोरील मॉनिटरमध्ये पाहताच त्यांना धक्का बसला. कार पुढे जात असताना पिवळ्या रंगाचा चंद्र दिसत होता. या चंद्राला कार सिग्नल समजून सारखा सारखा ब्रेक मारू लागली. यानंतर या प्रकाराचा नेल्सन यांनी व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला.
महत्वाचे म्हणजे, त्याने एलन मस्क यांना टॅग केले. चंद्र तुमच्या कारच्या ऑटो पायलट मोडला कसा फसवत आहे, हे तुम्ही तुमच्या टीमला नक्की सांगाल, असे म्हटले. जेव्हा जेव्हा कारने चंद्राचा पिवळा रंग ओळखला तेव्हा तेव्हा सिग्नल समजून कार हळू केली. 23 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये 13 वेळा कारने ब्रेक मारला. ड्रायव्हरही वैतागला होता. अखेर त्याने ऑटो पायलट मोड बंद करून कार पुढे चालवली.
हे फिचर विकत घ्यावे लागते....टेस्ला कार विकत घेतल्यावर हे सेल्फ ड्रायव्हिंग फिचर मिळत नाही. यासाठी 199 डॉलर मोजावे लागतात. या आधी कार खरेदी करताना १०००० डॉलर अधिकचे मोजावे लागत होते.