वर्ष संपता संपता २०२३ मधील तगडा देसी जुगाड समोर आला आहे. कारच्या काचा आपोआप खालीवर करण्यासाठी पठ्ठ्याने घरात वापरतो ते साधे ईलेक्ट्रीक सॉकेट आणि टूपिनचा वापर केला आहे. आपल्या देशात टॅलेंटची एवढी भरमार आहे की मर्सिडीज, ऑडीसारख्या कार कंपन्या देखील चकीत होतील. आता हा जुगाड पाहून कार कंपन्यांनी कॉस्ट कटिंगसाठी ही ट्रिक वापरली नाही तर ठीक, नाहीतर काही खरे नाही.
कारच्या खिडकीच्या काचा आपोआप खाली वर करण्यासाठी दरवाजावर बटन किंवा हँडल दिलेला असतो. आजकाल बहुतांश कारमध्ये ही ऑटो अप-डाऊनची सिस्टिम येते. परंतू, ते बटन खराब झाले तर कार कंपन्यांप्रमाणे ७०० ते १५०० रुपयांचा खर्च येतो. हा जो जुगाड केलाय त्याच्याही कारला ही बटने दिसत आहेत. परंतू, ती खराब झाली आहेत. म्हणून पठ्ठ्याने कोणतातरी मेकॅनिक गाठला आणि त्याच्या डोक्याने हा जुगाड केला आहे.
कारचा दरवाजा उघडायच्या नॉबकडून एक वायर बाहेर आलेली दिसत आहे. त्या वायरला साधे दहा-पंधरा रुपयांची इलेक्ट्रीक दुकानात मिळणारी टुपिन जोडलेली दिसत आहे. तसेच दरवाजावर सॉकेट लावलेले दिसत आहे. हे सॉकेट बाजारात ४०-५० रुपयांपासून मिळते. आतून बाहेर आलेली वायर १० रुपयांना मीटर या दराने मिळते. अशाप्रकारे अवघ्या ६०-७० रुपयांत पठ्ठ्याने हा जुगाड केलेला दिसत आहे. आतून आलेली वाय़र ही बॅटरी आणि काच खाली वर करणाऱ्या मोटरला टुपिन आणि सॉकेटद्वारे जोडलेली आहे.
कारसोबत मिळणारे विंडो खाली वर करण्याचे बटन हे काम कसे करते, वर ओढले की काच वर जाते आणि खाली दाबले की काच खाली जाते. इथे पठ्ठ्याने फेज-न्यूट्रलचा वापर केला आहे. पिन सुलट सॉकेटमध्ये घातली की काच खाली जाते, तिच पिन उलट करून पुन्हा घातली की काच वर जाते. इथे बटनाचाही त्रास वाचला आहे. फक्त खाली वर करताना टु पिन बाहेर काढून फिरवावी लागते, एवढाच काय तो त्रास होत आहे.