मुंबई - रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइकची प्रतीक्षा संपली आहे. भारतातील प्रसिद्ध टू व्हिलर कंपनीने EICMA 2023 इव्हेंटमध्ये आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाइकच्या संकल्पनेचे अनावरण केले आहे. चेन्नईस्थित दुचाकी कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक बाईक आहे, जी हिमालयनचा इलेक्ट्रिक अवतार असल्याचे दिसते. कंपनीने या इव्हेंटमध्ये नवीन हिमालयन ४५२ देखील लॉन्च केली आहे. लिक्विड कूल्ड इंजिनसह येणारी ही रॉयल एनफिल्डची पहिली बाईक आहे.
Royal Enfield Himalayan 452 ही पूर्णपणे नवीन बाईक आहे. यात अनेक प्रीमियम कंपोनेंट्स मिळतील ज्यामुळे ही बाईक उत्तम ऑफ-रोडर बाईक बनते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन हिमालयन सध्याच्या हिमालयन ४११ पेक्षा वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. या बाईकची जगातील सर्वात उंच उमलिंग-ला पास येथे चाचणी घेण्यात आली आहे.
रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइकबद्दल बोलायचं झाले तर, तिच्या डेव्हलपमेंटच्या बातम्या सातत्याने येत आहेत. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, रॉयल एनफिल्डने अखेर रॉयल एनफिल्ड HIM-E ही पहिली इलेक्ट्रिक बाइक जगासमोर आणली. कंपनीने आगामी इलेक्ट्रिक बाइकचं लॉन्चिंग EICMA 2023 मध्ये सादर केले आहे. त्याचं डिझाइन तुम्हाला हिमालयनची आठवण करून देईल. ही बाईक हिमालयानंचं इलेक्ट्रिक व्हर्जन दिसून येते.
नवीन इलेक्ट्रिक बाइक्सचा मार्ग मोकळा
रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक सध्याच्या हिमालयन आणि हिमालयन ४५२ पेक्षा थोडी वेगळी आहे. त्याची विंडशील्ड दोन्ही हिमालयनपेक्षा मोठी आहे. चार्जिंग पोर्ट हा पेट्रोल टाकीचं झाकण असते तिथे मिळेल. आगामी इलेक्ट्रिक बाइकमध्ये गोल्डन USD फोर्क्स उपलब्ध असतील. ही केवळ इलेक्ट्रिक बाइकचं कॉन्सेप्ट आहे हे लक्षात ठेवा.
ही ईव्ही कॉन्सेप्ट रॉयल एनफिल्डच्या नवीन मोटरसायकलसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करू शकते. म्हणजेच कंपनी या अंतर्गत आगामी इलेक्ट्रिक मॉडेल्स विकसित करू शकते. त्यामुळे रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक बाइकच्या येण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागणार आहे. रॉयल एनफील्ड हिमालयन ४५२ चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जुन्या हिमालयन 411 चा कोणताही भाग वापरण्यात आलेला नाही. ही एकदम नवीन बाइक आहे. कंपनीने अधिकृत वेबसाइटवर बुकिंगही सुरू केले आहे. ही बाईक २४ नोव्हेंबरपासून बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.