कारमध्ये नवनव्या सुधारणा करणे चालूच आहे. अनेकदा सारा काही व्यावसायिक व व्यापारी भाग असतो. त्यामुळे कारसाठी कोणतीही अतिरिक्त साधनसामग्री बाजारातून घेण्यापूर्वी दहावेळा विचार करावा. त्यात भारतासारख्या विकसनशील देशाची बाजारपेठ उपलब्ध झाल्यानंतर देशी परदेशी साधनसामग्रीचे उत्पादक वा व्यापारी त्यावर तुटून न पडले तरच नवल असते.
कारचे मूल्यमापन करताना तुम्ही स्वतःचा खिसा तपासायला हवा,त्याचप्रमाणे त्या कारला देखभालखर्च व अतिरिक्त साधनसामग्री बसवतानाही तुमच्या खिशाप्रमाणे दुसऱ्याचाही विचार करायला हवा. कारचा रिव्हर्स बझर हा एक असाच भाग आहे, की त्याची वास्तविक काही गरज नसते. तो कोणाचा शौकही होऊ शकत नाही. पण तरीही अनेकजणांना कार मागे घेताना म्हणजे रिव्हर्स घेताना त्या कारच्या रिव्हर्स घेण्याच्या क्रियेबरोबरच काहीतरी म्युझिक वा बझर लावण्याची सवय झालेली असते. कोणी आवाजासाठी, कोणी काहीतरी विशिष्ट ट्यून आवडली म्हणून तर कोणी दुकानदाराने सांगितले म्हणूनही हा रिव्हर्स बझर लावत असतो.
कार मागे घेताना ड्रायव्हरच्या समोर असलेल्या डॅशबोर्डमधील इंडिकेटर्सवर रिव्हर्स घेत असल्याचा एलईडी लागतो. त्यामुळे आपण कार रिव्हर्स घेत आहोत, ही क्रिया अधिक स्पष्ट होण्याचीही गरज नसते. दुसरी बाब म्हणजे कार रिव्हर्स घेण्यासाठी तुम्ही गीयर टाकता,ऑटोमॅटिक कार असेल तर त्यासाठीही तुम्ही त्याचा नॉब कार्यान्वित करता. म्हणजेच ड्रायव्हर हा कार रिव्हर्स घेताना पूर्ण सजग असतो. असला पाहिजेच. इतके होऊनही रिव्हर्सचा लाइट मागच्या बाजूने लागलेला असतो. अशा स्थितीत रिव्हर्स बझर वाजवत कार मागे घेण्याची आवश्यकताच उरत नाही.
एखादी व्यक्ती अनवधानाने मागे असेल व तिला कार मागे आपल्या अंगावर येत असल्याची जाणीव नसेल तर ती व्हावी म्हणून हा बझर आवश्यक आहे, असे कोणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. कार मागे आपोआप जात नाही, ती चालवणारा ड्रायव्हर तेथे असावा लागतो. अशा स्थितीत कारच्या ड्रायव्हरचे लक्ष पूर्णपणे तेथे हवे. ते नसेल तर रिव्हर्स घेणे व त्या पद्धतीने कार मागे घेणे, ही बाब बेदरकारीची म्हणावी लागेल. वास्तविक कार मागे घेताना ड्रायव्हरची दक्षता पुरेशी असते, तीच अधिक आवश्यक असते. रिव्हर्स बझरमुळे अनेकदा बराचवेळ रिव्हर्स घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बझर वाजत बसतो, त्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होत असतो. काही ठिकाणी कुत्रे या रिव्हर्स बझरमुळे भुंकत बसतात.
रात्रीच्यावेळी अशा प्रकारच्या आवाजाने किती त्रास होत असतो, विनाकारण ध्वनिप्रदूषण करीत असतो, त्याची जाण प्रत्येकाने ठेवायला हवी. रिव्हर्स बझर ही कदाचित एखाद्याच्या शौकाची बाब तरी त्याच्या वापरामुळे अन्य कोणाला त्रास होणार नाही, याची दक्षता त्याने घ्यायलाच हवी. वास्तविक या रिव्हर्स बझरची कायदेशीरदृष्टीनेच काय अगदी रिव्हर्स घेण्याचे तंत्र यादृष्टीने जराही आवश्यकता असत नाही. त्यामुळेच रिव्हर्स बझर लावून केवळ दुसऱ्यांना त्रास होण्यापलीकडे बाकी काहीच साध्य होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.