महामार्गावर रात्रीच्यावेळी कार चालवताना हेडलॅम्प कसा वापरावा, याविषयी मागच्या एका लेखामध्ये माहिती दिली होती. हेडलॅम्पमधील हायबीचा वापर करण्याची एक अतिशय चुकीची प्रथा सध्या पडलेली आहे, तशीच शहरामधील रस्त्यांवरही काही वाहनचालकांना हेडलॅम्पचा हायबीम चालू ठेवून रात्रीच्यावेळी दुसऱ्या वाहनांच्या चालकांना त्रास होईल, अशा प्रकारे वाहने रात्रीच्यावेळी चालवण्याची सवय लागलेली आहे. अनेकांना त्या हायबीमचा वापर कसा करावा, तेच कळत नाही. मुळात ड्र्याव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण देताना या बाबी सांगितल्याच जात नसाव्यात, असे म्हणण्यास वाव आहे.
याचे कारण या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे प्रामुख्याने दिवसा दिले जाते. कदाचित तोंडी माहिती देताना ते सांगितलेही जात असले तरी प्रत्यक्षात त्या कामाचा वापर करण्याची वेळ येतच नाही, त्यामुळे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेताना त्या हेडलॅम्प वापरण्याची अनुभूती(feeling) कोणत्याही प्रशिक्षणामध्ये येणे कठीण आहे. बहुतांशी प्रशिक्षण हे दिवसाच होत असते. यासाठीच हेडलॅम्प वापरण्याचे काम कसे असावे, हे अनेक ड्रायव्हर्सना समजत नाही. मोटारसायकल, स्कूटर, कार या वाहनांच्या चालकांकडून वापरला जाणारा हेडलॅम्प अनेकदा अयोग्य पद्धतीने वापरला जात आहे. पोलीस तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार, असा प्रश्नही आहेच. मात्र अपघात घडू नयेत, म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. त्यासाठी खरे म्हणजे वाहन विभागाने सुयोग्य वाहनचालनासंबंधात एक पुस्तिकाच देशातील विविध भाषांमध्ये तयार करायला हवी.
मोठ्या व मध्यम शहरांमध्ये प्रामुख्याने सोडियम व्हेपरचे दिवे लावलेले असतात. तर शहरांमधील वाहनांची गती ही मर्यादित असल्याने हेडलॅम्पमधील हायबीम वापरण्याची आवश्यकता नाही. लो-बीम म्हमजे डिप्पर वापरणेही भरपूर प्रकाशझोत असतो. क्रॉसिंगच्या ठिकाणी फ्लॅश लाईट वा पासिंग लाईट द्यावा तितका पुरेसा आहे. मात्र कायम हायबीम वा अप्पर लावण्याची गरज नाही. शहरात रस्त्यावरचे दिवे गेले असले तरी देखील शहरांमधील गतीमर्यादा लक्षात घेता हायबीमची आवश्यकता नाही. सिटी मोडमध्ये हेडलॅम्पचे लाइट ठेवले तरी साधारपणे चालू शकतात. मात्र नेहमी शहरांमधली रांगेची शिस्त पाळली व योग्य तेव्हा साईट इंडिकेटर्सचा वापर केला तरी रात्रीच्यावेळी शहरामधील वाहनचालक तुम्हाला व इतर वाहनचालकांप्रमाणेच पादचाऱ्यांनाही सुखकर असेल.