ब्लूमबर्ग : स्टार्टअप कंपन्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या चीनमध्ये इलेक्ट्रिक कार बनविणाऱ्या स्टार्टअप कंपन्यांना अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावे लागत आहे. तंत्रज्ञान, निधीची कमतरता आणि सध्या अमेरिकेसोबत सुरु असलेले व्यापार युद्ध यामुळे या कंपन्या मेटाकुटीस आल्या असून केवळ 1 टक्केच कंपन्यांनी तग धरला आहे. चीनमध्ये प्रदुषणाची पातळी कमालीची वाढली आहे. यामुळे सरकारनेइलेक्ट्रिक कार बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी अद्याप आपल्या इलेक्ट्रिक कार चीनच्या बाजारात म्हणाव्या त्या प्रमाणात उतरविलेल्या नाहीत. यामुळे उत्पादन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनमध्ये शेकडोंच्या संख्येने स्टार्टअप उभे राहिले होते. मात्र, या कंपन्यामध्ये संशोधनाचे पहिले पाऊलच अडखळले आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली आहे. शांघायमध्ये मुख्यालय असलेल्या एका गुंतवणूक कंपनीने 15 दशलक्ष डॉलर एवढी मोठी रक्कम काही स्टार्टअप आणि कार निर्मात्या कंपन्यांशी भागीदारी करत गुंतवली आहे. ही प्रक्रिया अत्यंत जटील आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि कार निर्मितीसाठी लागणारे मनुष्यबळ यामुळे या कंपन्या मेटाकुटीला आल्या असल्याचे या कंपनीचे गुंतवणूक अधिकारी इयान झू यांनी सांगितले. तसेच चीनमधील जुन्या कंपन्यांशी या कंपन्य़ांना स्पर्धा करावी लागत आहे. बऱ्याच कंपन्यांनी अद्याप उत्पादन सुरु केलेले नसले तरीही मोठ्या प्रमाणावर मागणी पूर्ण करणे या कंपन्यांच्या आवाक्यात नाही. यापूर्वी चीनने जागतिक स्तरावरील टेस्ला, बीएमड्ब्ल्यू एजी या कंपन्यांना चीनमध्ये इलेक्ट्रिक कार विक्रीस परवानगी दिलेली आहे. मात्र, या कंपन्याही अपेक्षेप्रमाणे विक्री करू शकलेल्या नाहीत, असेही झू यांनी सांगितले. अमेरिकेशी सुरु असलेले व्यापार युद्धही याला कारणीभूत आहे. जर हे असेच सुरु राहिले तर या कार सर्वसामान्यांना घेणे परवडणारे नसेल. कारण, यात वापरण्यात येणारे तंत्रज्ञान आणि संशोधन खुपच खर्चिक आहे.
चीनमध्ये केवळ 1 टक्केच इलेक्ट्रिक कार स्टार्टअप उरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 9:10 AM