लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : येत्या १ एप्रिलपासून दुचाकी व चारचाकी वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार आहे. या विम्याच्या हप्त्यात वाढ करण्यासाठी भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इर्डा) एक मसुदा तयार केला आहे.
प्रस्तावित दरानुसार १ एप्रिलपासून १,००० सीसी इंजिन असलेल्या खासगी कारच्या थर्ड पार्टी विम्यासाठी २,०९४ रुपये लागतील. आधी तो २,०७२ रुपयांत येत होता. १,००० ते १,५०० सीसी कारच्या विम्यासाठी आता ३,२२१ रुपयांऐवजी ३,४१६ रुपये लागतील. १,५०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या कारसाठी ७,८९० रुपयांऐवजी ७,८९७ रुपये लागतील.
१५० ते ३५० सीसीच्या दुचाकी वाहनांच्या विम्यासाठी आता १,३६६ रुपये मोजावे लागतील. ३५० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी विम्यासाठी २,८०४ रुपये लागतील. इलेक्टिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक प्रवासी वाहने तसेच मालवाहू वाहने यांना विम्यात १५ टक्के सूट देण्यात येणार आहे.
काय आहे थर्ड पार्टी विमायात पहिला पक्ष हा वाहन मालक असतो, दुसरा पक्ष वाहन चालक आणि अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्ती तिसरा पक्ष समजला जातो. अपघातग्रस्तास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वाहन मालकावर असते. थर्ड पार्टी विमा काढलेला असल्यास ही भरपाई विमा कंपनी देते.